वादळी पावसात दुमजली घराचे लोखंडी छप्पर लगतच्या घरावर कोसळले
ओटवणे - देऊळवाडीतील घटना ; दोन्ही घरांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान
ओटवणे प्रतिनिधी
बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात ओटवणे देऊळवाडीत दुमजली घराचे लोखंडी छप्पर लगतच्या घरावर कोसळले. सुदैवाने या घटनेत अनर्थ टळला मात्र या घटनेत दोन्ही घरांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ओटवणे देऊळवाडी येथे दत्तात्रय नारायण गावकर यांचे दुमजली घर असून लगतच दशरथ विष्णू गावकर यांचे घर आहे. अचानक आलेल्या वादळी पावसात दत्तात्रय गावकर यांच्या दुमजली घरावरील पूर्ण लोखंडी छप्पर उडून ते लगतच्या दशरथ गावकर यांच्या घरावर कोसळले. त्यामुळे दशरथ गावकर यांच्या घराच्या भिंतींना तडे जाऊन घराच्या भिंती कमकुवत बनल्या. तसेच दरवाजाचेही नुकसान झाले. दरम्यान याच वाडीतील संतोष महादेव गावकर यांच्या घराचे तीन पत्रे फुटून नुकसान झाले. तसेच रामदास सोमाजी गावकर यांच्या घरावरही माड कोसळून नुकसान झाले. या वादळी पावसात ओटवणे परिसरात ठिकठिकाणी झाडे कोसळून नुकसानीसह काही काळ वाहतूक ठप्प झाली.