पाटील मळ्यात पावसामुळे भिंत कोसळून नुकसान
बेळगाव : संततधार पावसामुळे शहर व तालुक्यात घरांची पडझड होण्याच्या घटना सुरूच आहेत. पाटील मळा येथील रामचंद्र गांधी यांच्या घराची भिंत दोन दिवसांपूर्वी कोसळलेली असून गुरुवारी तलाठी शिंदे व इतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. यामध्ये गांधी कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असल्याने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जुन्या घरांची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांचे संसार उघड्यावर पडत आहेत. नुकसान झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले जात आहेत. पाटील मळा येथील सीटीएस नंबर 303/32 येथील रामचंद्र गांधी यांच्या घराची भिंत पावसामुळे भिजून कोसळली. तातडीने कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.