चव्हाट गल्लीत घर कोसळून नुकसान
बेळगाव : सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर आणि तालुक्यातील घरांची पडझड सुरुच आहे. शुक्रवारी चव्हाट गल्ली, कल्याण चौक येथील किसन नागेंद्र शहापूरकर यांचे घर कोसळले आहे. यामुळे दोन ऑटो रिक्षा आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. दोन दिवसापूर्वी पाटील मळा येथील घराची भिंत कोसळून रामचंद्र गांधी यांचे नुकसान झाले होते. तलाठी शिंदे व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. या पाठोपाठ कल्याण चौक, घर नंबर 4418, चव्हाट गल्ली येथील किसन नागेंद्र शहापूरकर यांचे घर संततधार पावसामुळे पूर्णपणे कोसळले आहे. त्यामुळे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घरात कोणी राहत नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या दोन ऑटो रिक्षा व एका दुचाकीचे नुकसान झाले आहे.