'बसरा' काढण्यासाठी बंधारा हटवला
रत्नागिरी :
शहरानजीकच्या मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तब्बल पाच वर्षांनंतर हे जहाज काढण्यात येणार असून, सुमारे ३५ कोटींचे हे जहाज दोन कोटींमध्ये भंगारात काढले जाणार आहे. आता या जहाजाच्या बाजूला अर्धवट असलेल्या धूपप्रतिबंधक जुना बंधाऱ्याचे सपाटीकरण करण्यात येऊन त्याची उंची कमी करण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती पतन विभागाच्या सूत्रांनी दिली.
येथील किनाऱ्यावर अडकून पडलेले बसरा स्टार हे जहाज काढण्यासाठी एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीमार्फत सीमाशुल्क, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार सुरू होता. बसरा स्टार जहाजामुळे मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले आहे. त्यामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार देखील करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली.
हे जहाज काढण्याबाबत दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क करण्यात आलेला होता. त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. कन्सल्टंट कंपनीने तसा पत्रव्यवहार सुरू केला आहे. केंद्र शासनाची भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मूल्यांकन केले जाईल.
- लवकरच नवा बंधारा
जहाज भंगारात काढण्याच्या हालचाली गतिमान
रखडलेल्या नव्या बंधाऱ्याच्या कामाला येणार वेग