For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दालमिया इंडियाची महाराष्ट्र, कर्नाटकात 3,520 कोटींची गुंतवणूक

07:00 AM Mar 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
दालमिया इंडियाची महाराष्ट्र  कर्नाटकात 3 520 कोटींची गुंतवणूक
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

भारतातील आघाडीवरील सिमेंट कंपन्यांपैकी एक असलेली दालमिया भारत लिमिटेडने आपल्या सहयोगी  कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 3,520 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतभर विस्तार करण्याच्या उद्दिष्टाने आणि 2028 पर्यंत 75 दशलक्ष टन सिमेंट उत्पादनाचे लक्ष गाठण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

2031 पर्यंत 110-130 दशलक्ष टन क्षमतेचे ध्येय कंपनीने ठेवले आहे. कंपनी कर्नाटकमधील बेळगाव प्लांटमध्ये 3.6 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेचा क्लिंकर युनिट आणि 3 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेचा ग्राइंडिंग युनिट उभारणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील पुण्यात 3 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेचे नवीन ग्राइंडिंग युनिट उभारणार आहे. कर्ज आणि कंपनीच्या नफ्यातून ही गुंतवणूक केली जाणार आहे. हा उत्पादन विस्तार आणि आसाम, बिहारमध्ये सुरु असलेला 2.9 दशलक्ष टन उत्पादन क्षमता विस्तार बघता दालमियाची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता 55.5 दशलक्ष टन प्रति वर्षपर्यंत पोहोचेल. हे नवीन प्रकल्प 2027 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

बेळगाव ग्राइंडिंग युनिट दक्षिण महाराष्ट्रात कंपनीचा विस्तार करत प्रदेशातील सिमेंटची मागणी पूर्ण करेल. तर, पुणे ग्राइंडिंग युनिटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नव्या बाजारपेठांमध्ये कंपनीला प्रवेश मिळेल. ही गुंतवणूक आमच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे संपूर्ण भारतभर विस्तारासह 2028 पर्यंत 75 दशलक्ष टन उत्पादन क्षमता गाठण्याच्या उद्दिष्टाकडे कंपनीला वाटचाल करता येईल. पश्चिम भारतातील वाढत्या पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्पादन वाढवत आहोत, असे दालमिया भारत लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत दालमिया यांनी सांगितले. उत्पादन क्षमता वाढविण्याच्या आमच्या उद्दिष्टासह भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करत आहोत. आमची कार्यक्षमता आणि शाश्वतता भारतातील पायाभूत सुविधा व विकासाच्या उद्धिष्टाला सहाय्यक ठरेल, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.