दलाई लामांच्या विचारांची आज आवश्यकता
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांचे प्रतिपादन
कारवार : हिंसा आणि संघर्षानी व्यापलेल्या आजच्या जगात दलाई लामा यांच्या अहिंसात्मक आणि करुणामय विचारांची आवश्यकता आहे, असे उद्गार केंद्रीय संसदीय व्यवहार आणि अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू यांनी काढले. गेल्या काही दिवसांपासून बौद्ध धर्मगुऊ आणि नोबल पुरस्कार विजेते दलाई लामा कारवार जिल्ह्यातील मुंदगोड जवळच्या तिबेटीयन कॉलनीमध्ये वास्तव्य करून आहेत. रविवारी दलाई लामा यांच्या उपस्थितीत बौद्ध धर्मियाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री रिजीजू म्हणाले, दलाई लामा यांचे वर्णन प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक जगाच्या दरम्यानचा सेतू म्हणून करता येईल. दलाई लामा आमच्या देशाला आपली आर्यभूमी म्हणून हाक मारतात. दलाई लामा यांच्याकडून आमच्या देशाची केली जाणारी आठवण हे आमच्या देशाला मिळालेले मोठे भाग्य आहे.
मंत्री रिजीजू पुढे म्हणाले, देशाच्या वेगवेगळ्या भागात शांततेने वास्तव्य करून राहणाऱ्या तिबेटीयन नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचविण्यास आपण वचनबद्ध आहे. दलाई लामा यांचे उत्तराधिकारी निवडण्याचा संपूर्ण हक्क धर्मगुरु दलाई लामा आणि त्यांच्या संस्थेला आहे. यामध्ये कोणत्याही देशाचा किंवा व्यक्तीचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांचेही समयोचित भाषण झाले.