दलाई लामाच नेमणार उत्तराधिकारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आपला उत्तराधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार दलाई लामा यांचाच आहे. अन्य कोणीही त्यात हस्तक्षेप करु शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे. या भूमिकेमुळे दलाई लामा यांना बळ मिळाले आहे. सध्या भारतात असलेले दलाई लामा आणि चीन यांच्यात तिबेटच्या धार्मिक उत्तराधिकाऱ्याच्या निवडीवरुन वाद होत आहे. भारताने या वादात दलाई लामांची बाजू घेतली आहे. दलाई लामा सध्या 89 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. मात्र, दलाई लामा यांना त्यांच्या मनाप्रमाणे उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार नाही. त्यांनी निवडलेल्या उत्तराधिकाऱ्याला चीनच्या प्रशासनाची मान्यता असणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची निवड वैध मानली जाणार नाही, असे चीनचे म्हणणे आहे. चीनने 1959 मध्ये तिबेटवर ताबा मिळविला आहे. त्यामुळे तिबेट आता चीनच्या आधीन आहे. परिणामी दलाई लामा यांची सत्ता तेथे चीनच्या सहमतीशिवाय चालणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
लामांनी चीनला वगळले
उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेतून दलाई लामा यांनी चीनला वगळले आहे. त्यामुळे चीन संतापला आहे. दलाई लामा बेकायदेशीर पद्धतीने आणि परंपरेचा भंग करुन आपल्या उत्तराधिकाऱ्याची निवड करीत आहेत, असा चीनचा आरोप आहे. तथापि, दलाई लामा यांनी हा आरोप फेटाळला आहे. ‘पुनर्जन्मा’च्या परंपरेनुसार उत्तराधिकारी निवडला जाईल. चीनचा या प्रक्रियेशी काहीही संबंध नाही चीनला तिबेटची स्वायत्तता संपुष्टात आणायची आहे. त्यामुळे चीन दलाई लामा यांचा अधिकार नाकारत आहे, असे लामा यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
तोडगा निघणे दुरापास्त
सध्याचे दलाई लामा 1959 मध्ये तिबेट सोडून भारतात आले आहेत. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे त्यांनी तिबेटचे अज्ञातवासातील सरकार स्थापन केले केले. भारतानेही या सरकारला आणि त्यांना राजाश्रय दिला आहे. आतापर्यंत त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. त्यांची तिबेटच्या धार्मिक आणि राजकीय प्रमुखपदावर नियुक्ती चीनने तिबेटचा ताबा घेण्याच्या आधीच झाली होती. त्यामुळे चीनला काही करता येत नव्हते. तथापि आता त्यांनी उत्तराधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया हाती घेतल्याने चीनने हस्तक्षेप करण्यास प्रारंभ केला आहे. भारताने मात्र, दलाई लामा यांना आपले स्पष्ट समर्थन दिले आहे.