दक्षिणेश्वर सुरेशची आगेकूच
वृत्तसंस्था / बेंगळूर
दक्षिणेश्वर सुरेशने बेंगळूर ओपनमध्ये आपल्या मोहिमेची दमदार सुरूवात केली. क्रोएशियाच्या डुजे अजडुकोविचचा 6-4, 6-4 असा पराभव करुन शेवटच्या सोळा खेळाडूंत स्थान मिळविले.
सहा फूट सहा इंच उंचीचा हा भारतीय खेळाडू संपूर्ण सामन्यादरम्यान पूर्णपणे नियंत्रणात होता. त्याने आपल्या प्रभावी पहिल्या सर्व्हिसच्या जोरावर 20 बिनतोड सर्व्हिस केल्या. ज्यामुळे त्याला सुरूवातीपासून सामन्यावर वर्चस्व गाजवता आले. गेल्या वर्षी भारतासाठी डेव्हिस चषकामध्ये पदार्पण करणाऱ्या सुरेशने पहिल्याच सेटमध्ये सर्व्हिस ब्रेक मिळवून त्वरीत प्रभाव पाडला आणि खोल रिटर्न्सने अजडुकोविचच्या सर्व्हिसवर सतत दबाव आणला. विश्वसनीय सर्व्हिस आणि बेसलाईन अचूक फटकेबाजीच्या जोरावर त्याने सहजपणे आपली आघाडी कायम ठेवली आणि सेट 6-4 ने जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये अजडुकोविचने आपल्या सर्व्हिसमध्ये सुधारणा केली. परंतु सुरेश रॅलीमध्ये संयम राखत राहिला आणि पाचव्या गेममध्ये आक्रमक फोरहँडच्या मालिकेने संधी साधत ब्रेक मिळविला. त्यानंतर त्याने प्रचंड संयम दाखवत आत्मविश्वासाने सर्व्हिस राखली आणि सरळ सेटमध्ये विजय मिळविला. दरम्यान क्रोएशियाच्या बोर्ना गोजो आणि कझाकस्तानच्या बेबिट झुकायेव यांनी आपापल्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंचे आव्हान परतवून लावले. त्यांनी अनुक्रमे करण सिंगचा 6-2, 6-4 आणि आर्यन शाहचा 6-1, 6-2 असा पराभव केला. जर्मनीच्या सेड्रिक मार्सेल स्टेबेने नेदरलँड्सच्या सातव्या मानांकीत मॅक्स हाउकेसवर 4-6, 6-3, 6-1 असा जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला आणि 16 च्फा फेरीत प्रवेश केला. युक्रेनचा एरिक वॅनशेल्बोइम, मलेशियाचा मित्सुकी वेई कांग लिओंग आणि फ्रान्सचा फेलिक्स बाल्शॉ यांनीही दिवसाच्या सुरूवातीलाच पुढील फेरीत प्रवेश मिळविला. दुहेरीच्या सामन्यात साकेत मायनेनी आणि आदिल कल्याणपूर या भारतीय जोडीने एका अटीतटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या लॉइड हॅरिस आणि भारताच्या सुमित नागल यांचा 7-6 (3), 4-6, 13-11 असा पराभव केला. तिसऱ्या मानांकीत फ्रान्सचे आर्थर रेमंड आणि लुका सांचेझ, तसेच कोलंबियाचे निकोलस बॅरिएंटोस आणि अमेरिकेचे बेंजामिन किट्टे यांनीही दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.