दक्षिणायन किरणोत्सवाला आजपासून सुरुवात
कोल्हापूर :
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. किरणोत्सव सायंकाळी पाचच्या सुमारास सुरु झाल्याचे गृहित धरले जाईल. हीच वेळ पकडून 13 नोव्हेंबरपर्यंत रोज किरणोत्सव सुरु झाल्याची नोंद ठेवण्यात येईल. दरम्यान, गेल्या दोन दिवसांप्रमाणे शुक्रवारीही किरणोत्सवाची तिसरी चाचणी घेण्यात आली. यामध्ये मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या कमरेपर्यंत जाऊन लुप्त झाल्याचे दिसून आले. सूर्यकिरणे कमरेपर्यंत जाण्यापूर्वी ज्या क्षणाला अंबाबाईच्या चरणांवर होती, त्यावेळी त्यांची तिव्रता 43 लक्स (एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीचा पडणारा प्रकाश हा एक लक्स अशा प्रमाणात मोजला जातो.) इतकी होती. आकाश निरभ्र राहिल्यामुळे सूर्यकिरणांची तिव्रता चांगल्याप्रकारे होती.
अंबाबाई मंदिरातील गऊड मंडप उतरवला आहे. त्यामुळे मंडपातील सदर उजेडात आली आहे. शिवाय गऊड मंडप नसल्याने किरणोत्सवात रोज सूर्यकिरणे गतवर्षांच्या तुलनेत 3 मिनिटे लवकर सदरेवर येणार आहेत.
यापूर्वीच्या काळात किरणोत्सवात मंदिराच्या महाद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश करणारी सूर्यकिरणे सर्वप्रथम गऊड मंडपावर पडायची. त्यानंतर 3 मिनिटे उशिराने मंडपातील सदरेवर सूर्यकिरणे यायची. यंदाच्या किरणोत्सवात मात्र गऊड मंडपच नसल्याने सूर्यकिरणे मंदिराच्या महाद्वारातून थेट सदरेवर 3 मिनिटे आधीच पोहोचणार आहेत, असे विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र विभागाचे अॅडजंक्ट प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी घेतलेल्या सलग तिसऱ्या दिवसाच्या चाचणीमध्ये अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर 13 हजार 600 लक्स इतक्या तिव्रतेने असलेली सूर्यकिरणे मिनिटा-मिनिटांचा प्रवास करत 5 वाजून 23 मिनिटांनी अंबाबाई मंदिरातील गणपती चौकात आली होती. यानंतर पुढील 10 मिनिटांच्या कालावधीत हीच सूर्यकिरणे अंबाबाईच्या गाभाऱ्याच्या चांदीच्या उंबरठ्यापर्यंत गेली होती. यानंतर 5 वाजून 43 मिनिटांनी सूर्यकिरणांनी अंबाबाईचे चरणस्पर्श केले. मंदिराच्या महाद्वारापासून अंबाबाईच्या चरणांपर्यंत आलेल्या सूर्यकिरणांची दिशा मॅग्नेटो मीटरने पाहिली गेली. यामध्ये सूर्यकिरणांची दिशा किरणोत्सवासाठी अनुकूल असल्याचे दिसून आले. या अनुकुल वातावरणामुळेच सूर्यकिरणे 5 वाजून 47 मिनिटांनी अंबाबाईच्या कमरेपर्यंत जाऊन लुप्त झाली.