दाजीपूर अभयारण्यात पर्यटकांना वाघाचे दर्शन; वन्यजीव विभागाच्या नियोजनाला यश : सफारीच्या दुसऱ्याच दिवशी 'राणोजी'चे दर्शन
महेश तिरवडे
राधानगरी : दाजीपूर अभयारण्यात जंगल सफारीसाठी गेलेल्या पनवेल व कोल्हापूर येथील पर्यटकांना सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. अभयारण्यात मुक्तपणे वावरणाऱ्या वाघाला जवळून पाहायला मिळाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे आहे. १ नोव्हेंबरपासून अभयारण्य पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाघाचे दर्शनाने दाजीपूर जंगल सफारीचे आकर्षण वाढले आहे.
वन्यजीव विभागाने जंगल सफारीसाठी केलेले नियोजन, वाहनांची निश्चित केलेली संख्या, वेळेचे बंधन आणि प्रत्येक वाहनासोबत मार्गदर्शकाची सक्ती यामुळे वन्यप्राण्यांचे दर्शन होण्यास मदत होत आहे. जंगलात वन्यप्राण्यांना पर्यटकांच्या वाहनांचा त्रास कमी व्हावा, तसेच पर्यटकांना सुरक्षितपणे वन्यजीव निरीक्षण करता यावे, या उद्देशाने सफारीचे नियोजन केले आहे. या सकाळी सहा व दुपारी दोन या निर्धारित वेळेतच मर्यादित वाहनांना प्रवेश दिला जात आहे. प्रत्येक वाहनामध्ये गाईड असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पर्यटकांना वन्यजीवांबाबत योग्य माहिती मिळते. दुपारचा काळ हा अनेक वन्यप्राण्यांच्या विश्रांतीचा असल्याने निर्धारित वेळेतच सफारीचे नियोजन केले आहे.
गेल्या दोन वर्षांत अभयारण्य परिसरात गवत कुरणांची निर्मिती, पर्यटन विकास आणि वन्यजीवांच्या अधिवास संवर्धनासाठी विविध कामे करण्यात आली आहेत. तसेच अभयारण्य क्षेत्रातील विविध ठिकाणी सुमारे २० पाणवठे तयार केले आहेत. बोअरवेलद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. सौरऊर्जेच्या साहाय्याने पाणवठ्यांमध्ये पाणी भरले जात असल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे.
पर्यटकांमध्ये आनंदी वातावरण
दाजीपूर येथील सफारी चालक प्रसाद कोरगावकर हे सोमवारी सकाळी पर्यटकांना घेऊन जंगल सफारीसाठी जात असताना 'होळीचा सडा' परिसरात त्यांना 'राणोजी' वाघ दिसून आला. पर्यटकांना वाघाचे दर्शन झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अभयारण्यात सध्या आठ ते दहा वाघ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
