चार महिन्यांनी जंगल सफारी सुरु; दाजीपूरच्या जंगलातील तंबू निवास, निसर्गाचा खजिना 1 ऑक्टोबरपासून होणार खुला
राधानगरी: चार महिन्यांपूर्वी पावसाळी वातावरण व वन्यजीवांचा प्रजनन काळ तसेच पर्यटकांची सुरक्षितता कारणास्तव दाजीपूर अभयारण्य भटकंतीसाठी बंद होते. ते साधारणतः 1 नोव्हेंबर रोजी सुरू होते. परंतु, यंदाच्या वर्षी दाजीपूरमध्ये असणारे वन्यजीव विभागाचे वैशिष्ट्यपूर्ण तंबू निवास व लोकल जंगल सफारी एक महिना अगोदरच म्हणजेच गुरुवार दि. 1 ऑक्टोबरला पर्यटकांसाठी सुरू होत आहे.
संपत आलेला पावसाळा, सर्वत्र हिरवीगर्द झाडी व बराच काळ बंद असलेला जंगल परिसर अशा नैसर्गिक वरदानाने परिपूर्ण दाजीपूर जंगलामधील ठक्याचा वाडा हा रम्य परिसर. येथे वन्यजीव विभागाचे सुरक्षित व आलिशान तंबू निवास उपलब्ध आहेत. पर्यटकांना सहकुटुंब जंगल परिसर पाहता यावा, यासाठी वन्यजीव विभागाच्या अधिकृत उघड्या जीपगाडी मधून हसणे धबधबा, माळेवाडी धरण, राधानगरी धरण बॅक वॉटर, उगवाई देवी मंदिर, शिवगड आणि झांजूचे पाणी हा परिसर सध्या सफारी म्हणून दाखवला जात आहे.
या तंबू निवासामध्ये पर्यटकांसाठी न्याहरीसाठी व भोजनाची गावरान तितकीच गावाकडील आपुलकीची व्यवस्था देखील उल्लेखनीय आहे. या जंगल सफारीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी सहकुटुंब हजेरी लावावी, असे आवाहन विभागीय वन्यजीव अधिकारी श्रीकांत पोवार, उपविभागीय अधिकारी प्रियांका भवार आणि दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी केले आहे.
पावसाळ्यानंतर दाट व राखीव जंगल सफारी
अभयारण्य क्षेत्रातील राखीव अशा दाट जंगल परिसरातील जंगल सफारी पावसाळी वातावरण संपल्यानंतर पर्यटनासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्वतयारी करून सुरू करण्यात येणार आहे. सध्या जंगल परिसरातील तंबू निवास व लोकल जंगल सफारी सुरू होत आहे. आरक्षणासाठी वन्यजीव विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन दाजीपूर अभयारण्य विभागाने केले आहे.