For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मजगावसह उपनगरात रोज टँकरने पाणी पुरवठा

10:19 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
मजगावसह उपनगरात रोज टँकरने पाणी पुरवठा
Advertisement

गाव पंचकमिटीच्यावतीने श्री ब्रम्हदेव मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय : पाणीपुरवठ्याच्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान

Advertisement

वार्ताहर /मजगाव

मजगावातील पाणी उपसा करणाऱ्या टँकर्सनी रोज एक ट्रीप मजगावातील व परिसरातील नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करणार आहे. असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. सध्या मजगावातील विहिरी आणि कूपनलिका निम्म्याहून अधिक सुकल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मजगाव गाव पंचकमिटीच्यावतीने रविवार दि. 7 रोजी दुपारी श्री ब्रम्हदेव मंदिरात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बी. डी. कुडची होते. या बैठकीस देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य व नगरसेविका प्रिया सातगौडा व परिसरातील युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंच शिवाजी पट्टण यांनी उपस्थित वॉटर सप्लायर्सच्या मालकांचे स्वागत करून पाणीसमस्या संदर्भात चर्चा केली. गावातील ब्रम्हदेव मंदिरसमोरील तलाव संपूर्ण सुकल्याने मजगावातील जनावरांचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

दिवसभर बकरी, म्हैस व गायी चारून आल्यानंतर पाण्यासाठी तलावात पाणी पाजत होते. परंतु यावर्षी गावचे दोन्ही तलाव सुकल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकरीता सदर बैठकीचे आयोजन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी नगरसेविका प्रिया दीपक सातगौडा यांनीही चर्चेत भाग घेतला. तसेच बी. डी. कुडची, दीपक सातगौडा या सर्वांनी चर्चेत भाग घेवून प्रत्येक वॉटर सप्लायर्सने रोज एक टँकर मोफत पाणी गावात व उपनगरात देण्याचे जाहीर केले. मजगावातून सुमारे 10 ते 12 टँकर्स रात्रंदिवस पाण्याचा उपसा करीत आहेत. त्यामुळेच मजगावातील संपूर्ण विहिरी सुकल्याचे यावेळी सांगण्यात आले. सध्या पाण्याचे दर मुहमांगे सुरू असल्याचे समजते. काही ठिकाणी 800 ते 1000 रुपये मागणी केली जात आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नळपाणी पुरवठा सध्या सुरळीत सुरू असून जर पिण्याचे पाणी कमी पडल्यास एल अँड टीमार्फत गल्लोगल्ली पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन नगरसेविका प्रिया सातगौडा यांनी या बैठकीत दिले. आभार प्रदर्शन दीपक सातगौडा यांनी केले.

Advertisement
Tags :

.