लक्षतीर्थावर रोजच जलदिन...
नैसर्गिक तळे लोकांनी श्रद्धेने जपले
कोल्हापूरः सुधाकर काशीद
दरवर्षी २२ मार्चचा दिवस म्हणजे जलदिन. पाण्याचे पूजन. जलसाठे वाचवा हे आवाहन व पाणी वाचवण्याची शपथ हे ठरलेले असते. हा दिवस उलटला की पुन्हा ‘जैसे थे’ हे देखील त्याच दिवशी सर्वांनी समजून घेतलेले असते. पाणी वाहते, कोणाला चिंता नाही. पाणी दूषित होतेय, कोणाचं लक्ष नाही. पाण्याचा साठा मुजवला जातोय, कोणाला फिकीर नाही. कारण पाणी मुबलक असताना पाण्याचे महत्व त्यावेळी कोणाला नसते. पण एक दिवस पाणी आले नाही की सर्वांची त्रेधातिरपीट उडते. पाणी जपायला हवे होते, हे पाणी टंचाईच्या काळात क्षणाक्षणाला जाणवायला लागते. पण लक्षतीर्थ वसाहतीत गेले कित्येक पिढ्या पाण्याचा थेंब आणि थेंब जपला जात आहे. त्यामुळे कोल्हापुरातले हे एकमेव लक्षतीर्थ जलक्षेत्र जसेच्या तसे आपले अस्तित्व टिकवून राहिले आहे. जणू काही येथे रोजच जलदिन पाळला जात आहे.
हे नितळतळे लक्षतीर्थ वसाहतीत आहे. कोटीतीर्थ, वरूणतीर्थ, कपिलतीर्थ, रावणेश्वर, पद्माळे तीर्थ, रंकाळा फिरंगाई, खंबाळा ही कोल्हापुरातील प्राचीन तळी व जलसाठे. यापैकी कपिलतीर्थ मुजवून कपिलतीर्थ मंडई, रावणेश्वर तलाव मुजवून शाहू स्टेडियम, पद्माळे तीर्थ मुजवून क्रीडा संकुल, वरूणतीर्थ मुजवून गांधी मैदान, फिरंगाई तळे मुजवून पेटाळा मैदान आणि खंबाळा तळे मुजवून लक्ष्मी-सरस्वती टॉकीज उभी राहिली. कोटीतीर्थ, रंकाळा तलावात आज पाणी आहे, पण ते इतके प्रदूषित की चूळ भरायलाही कोणी तोंडात घेत नाही, अशी त्याची परिस्थिती आहे. याचे कारणच हे की भरपूर पाणी असून त्याचे महत्त्व कधीच गंभीरपणे घेतले गेले नाही.
पण याला नक्की अपवाद लक्षतीर्थ तळ्याचा राहिला आहे. हे तळे अगदी जाणीवपूर्वक तेथील सर्व रहिवाशांनी मिळून जपले आहे. या तळ्यात आजही नितळ पाणी आहे. लक्षतीर्थ तळे म्हणून ओळख असली तरीही या परिसराचे मूळ नाव तोफेचा माळ. कारण संस्थानकाळात या तळ्याजवळच्या माळावर दारूगोळ्याचा साठा ठेवला जात होता. चुकून कधी दारू गोळ्याच्या साठ्याला आग लागली तर त्याची झळ नागरी वस्तीत पसरू नये म्हणून संस्थांनच्यावतीने ही खबरदारी घेण्यात आली होती. आणि दारूगोळा किंवा तोफखाना व्यवस्थित आहे, याची जाणीव करून देण्यासाठी रोज दुपारी बारा वाजता या माळावरून तोफ उडवली जात होती. या तोफेचा आवाज कोल्हापुरात जाऊन धडकायचा. आणि ‘बारा वाजले’ ही वेळ ही लोकांना कळायची.
या माळावर पूर्वी फारशी वस्ती नव्हती. राऊत, मोहिते, पाटील, पुजारी, खेडकर, सरनाईक, कुरणे अशी ठराविकांचीच घरे होती. बाकी सारा माळ रिकामा होता. नंतर लक्षतीर्थ वसाहत झाली. पण विशेष हे की लक्षतीर्थ तळ्याच्या पाण्यात कोणाला कधी कपडे धुवून दिले गेले नाही. जनावरे कुणी तळ्यात सोडली नाहीत. घरातले निर्माल्यही सोडले नाही. गणेश विसर्जनात तर एकही मूर्ती तळ्यात कधी कोणी सोडली नाही. तळ्यात कोणी कचरा टाकला तर त्याची अद्दल त्याला घडवली जाऊ लागली. लोकांनी तळे जपायची, अशी जणू शपथ घेतली. तळ्याच्या काठावर दरवर्षी महाशिवरात्री महोत्सव साजरा होतो. मोठी जत्रा भरते. पण कागदाचा एक कपटा तळ्यात टाकू दिला जात नाही. तळ्यात पावसाळ्यात येणाऱ्या प्रवाहात कोठेही अडथळा करू दिला जात नाही. परिणामी आजही तळे नितळ आहे. फक्त तळ्याच्या निम्म्या भागात कमळाचेच अच्छादन आहे. तळ्यात मासे आहेत. मरळ नावाचे मासे तर तीन-चार फुटाचे आहेत. त्यामुळे लक्षतीर्थ तळे नागरिकांनी जपले आहे. फक्त जलदिनादिवशीच पाणी वाचवण्याची शपथ येथे घेतली जात नाही. त्याचे प्रसिद्धीसाठी फोटो काढले जात नाहीत.टयेथे रोजच जलदिन पाळला जात आहे त्यामुळेच लक्षतीर्थ अजूनही नितळ आहे.