'हवाला' ची रोजची 15 कोटींची थांबली उलाढाल
कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
राज्यात निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हात उभारलेल्या तपासणी नाक्यांचा धसका हवाला रॅकेटनेही घेतला आहे. तपासणी नाक्यांवर वाहनांची कडेकोट तपासणी होत असल्याने रोख रक्कमेची वाहतूक करण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी हवाला रॅकेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार 23 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याच्या अप्रत्यक्ष सुचना देण्यात आल्या आहेत. यामुळे दररोज चालणारी कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण ठप्प झाली आहे.
निवडणूकीच्या आचारसंहितेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्याचा मुद्दा चांगलाचा तापला आहे. याचा चांगलाच धसका हवाला रॅकेट चालविणाऱ्यांनीही घेतला आहे. निवडणूकीच्या काळात 23 नोव्हेंबरपर्यंत हवाला रॅकेट बंद ठेवण्याचा मॅसेच हवाला रॅकेटच्या म्होरक्यांनी दिला आहे.
असे चालते हवाला रॅकेट
‘हवाला‘ या शब्दाचा अर्थ होतो, एखाद्या व्यक्तीवर, गोष्टीवर विश्वास ठेवणे. हवाला व्यापाराचा मूळ पायाच विश्वासावर टिकून आहे. हवाला व्यवसाय हा पुर्णपणे विश्वासावर चालतो. हवाला रॅकेटचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. कोट्यावधींची रक्कम अवघ्या काही तासांमध्ये देशाच्या एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठविण्यासाठी याच वापर केला जातो. हा व्यवहार झटपट आणि गुप्तपणे चालतो. सरकारी यंत्रणा आणि तपास संस्थांच्या नजरेत धूळपेक करत हा व्यवहार चालतो.कोल्हापूर जिह्यातून दिवसाला हवालाच्या माध्यमातून सुमारे 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल होते. कोट्यावधी रुपयांची रक्कम एका शहरातून दुसऱ्या शहरात केवळ विश्वासावर आणि एका सिक्रेटकोडद्वारे पाठविण्यात येते.
हुपरी, गांधीनगर हॉटस्पॉट
सोने आणि चांदीच्या दांगिन्यांसाठी प्रसिद्ध असणारी हुपरी, कापड व्यवसायासह, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बांधकाम साहित्यासाठी प्रसिद्ध असणारे गांधीनगर हवालाच्या रकमेचे हॉटस्पॉट आहेत. दिवाळीमध्ये या दोनही ठिकाणी कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली होती. यातील कर चुकवून वापरण्यात येणारी रक्कम हवालामार्फत अन्यत्र पाठविण्यात येते, मात्र हवालाची उलाढाल ठप्प झाल्यामुळे हुपरी, गांधीनगरसह गुजरीतील काही व्यापारी हवालदिल झाले आहेत. यातच आचारसंहितेच्या काळात खात्यावरही अधिक व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. यामुळे या ठिकाणचे व्यापारी शॉकमध्ये आहेत.
रोकड, सोन, चांदीची उलाढाल ठप्प
हवाला रॅकेटमधून रोख रकमेसोबतच सोनं, चांदीचेही व्यवहार केले जातात. जीएसटी चुकवून करण्यात आलेले व्यवहार आणि यातून मिळणारी रक्कम मुख्यत्वे हवाला रॅकेटमध्ये वापरण्यात येते. यामुळे हुपरी आणि गांधीनगर मध्ये रोकडची चणचण भासत आहे.
कमिशन एजंटवर संक्रांत
हवाला रॅकेट संपूर्ण देशभर आहे. कोल्हापूर शहरातही हवाला रॅकेट चालविणारे प्रमुख 10 ते 15 जण आहेत. त्यांचे एजंट 100 हून अधिक आहेत. या सर्वांना 1 ते 5 टक्क्यापर्यंत कमिशन दिले जाते. आता हवालाचे व्यवहाराच बंद असल्यामुळे या कमिशनवर अवलंबून असणाऱ्या एजंटवर मात्र संक्रांतीची वेळ आली आहे. निवडणूकीच्या काळात या एजंटांना सुगीचे दिवस असतात, मात्र आता कडेकोट तपासणी नाक्यांमुळे या एजंटवर शिमगा करण्याची वेळ आली आहे.
जिह्यात 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
रोख रक्कम : 6 कोटी
9 किलो सोने : 7 कोटी
60 किलो चांदी : 1 कोटी