For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पद्मश्री मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

06:55 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
पद्मश्री मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
Advertisement

8 ऑक्टोबर रोजी होणार सन्मान : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवार, 30 सप्टेंबर रोजी ही घोषणा केली. 8 ऑक्टोबर रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी आश्चर्य व्यक्त करत ‘हसावे की रडावे हेच मला उमजेना झालंय...’ अशी दिलखुलास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Advertisement

मिथुन चक्रवर्ती यांनी जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत बंगाली, हिंदी, तामिळी, तेलगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी भाषेतील 350 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यांनी 1976 मध्ये मृगया या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला प्रारंभ केला. या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1982 मध्ये डिस्को डान्सरमधून त्यांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. त्यानंतर सातत्याने त्यांचा अभिनय खुलतच गेल्याने तब्बल तीनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. जानेवारी 2024 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

मागील वर्षी वहिदा रहमान सन्मानित

2023 मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या आठव्या महिला ठरल्या होत्या. त्यांच्या अगोदर देविका राणी, ऊबी मेयर्स, कानन देवी, दुर्गा खोटे, लता मंगेशकर, आशा भोसले आणि आशा पारेख यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

नक्षलवादी ते अभिनेता

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली आहे. ग्रॅज्युएशननंतर मिथुन नक्षलवादी चळवळीत सामील झाला आणि कट्टर नक्षलवादी झाल्याने घरापासून दूर होता. काही वर्षांनी त्यांचा एकुलता एक भाऊ अपघातात मरण पावला. घरची बिकट परिस्थिती पाहून नक्षल चळवळ सोडून मिथून पुन्हा घराकडे वळले. नक्षलवादाशी संबंध तोडल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका होता, पण ते डगमगले नाहीत. कुख्यात नक्षलवादी रवी रंजन याच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती.

पुण्यात घेतले अभिनयाचे धडे

नक्षलवादी चळवळीतून घरी परतल्यावर मिथुन चक्रवर्ती यांचा कल हिंदी सिनेमाकडे वळला. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. त्यानंतर कामाच्या शोधात ते मुंबईत पोहोचले. हालअपेष्टांमध्ये दिवस काढत असतानाच अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि प्रतिक्षेनंतर त्यांना हेलनचा साहाय्यक बनण्याची संधी मिळाली. मिथुनना हेलनचा साहाय्यक म्हणून फिरताना पाहून काही चित्रपट निर्मात्यांनी त्याला छोट्या-छोट्या भूमिकाही दिल्या. अमिताभ बच्चन यांच्या ‘दो अंजाने’ या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांना अन्य अनेक संधी उपलब्ध होत गेल्या.

लिम्का बुकमध्ये नोंद

1989 साली मिथुन चक्रवर्ती यांचे 19 चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांमध्ये ते मुख्य अभिनेता म्हणून झळकले होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तब्बल 35 वर्षानंतरही हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.

मिथुन दा म्हणाले...

खरे सांगायचे तर असा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यानंतर मी अवाक झालो आहे. मला ना रडता येत आहे...  ना मला हसू येत आहे... इतका मोठा हा सन्मान आहे. मी हा पुरस्कार माझे कुटुंब, सहकारी आणि जगभरातील चाहत्यांना समर्पित करतो.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे . माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार दिला जातो . भारतीय चित्रपट सृष्टीची वाढ आणि विकासासाठी अपवादात्मक आणि उत्कृष्ट योगदानासाठी चित्रपट व्यवसायातील उत्तम कलाकारांना सुवर्णकमळ व १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Advertisement
Tags :

.