For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दादांची अकल्पीत एक्झिट

12:24 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
दादांची अकल्पीत एक्झिट
Advertisement

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमानाला बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. ज्यामध्ये दादांसह पाच जणांचा होरपळून अंत झाला. संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करणारी अशी ही घटना. या एका घटनेने महाराष्ट्रातील एका उमद्या नेत्याला काळाच्या पडद्याआड नेलं आहे. आता उरल्या आहेत केवळ आठवणी. दादांच्या प्रामाणिकपणाचे, वक्तशीरपणाचे, वादग्रस्त बोलण्याचे किस्से. नावाप्रमाणेच हा माणूस अजित होता. 1980 च्या दशकात सहकारातून बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि कृषी कुलगुरू आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे राजकारण सुरू झाले. अकाली पित्याचे छत्र हरपल्याने दोन चुलत्यांनी या पुतण्याला राजकारणात पुढे चाल द्यायची ठरवले. त्यांनी सहकारी साखर कारखानदारी आणि बाजार समितीच्या राजकारणात काकांच्या सैन्याला यशाचे पाणी चाखायला दिले. दशकभराच्या राजकारणानंतर त्यांच्यासाठी लोकसभेचे दार उघडले गेले ते 1991 साली. देशाची मंदावलेली अर्थगती आणि सुस्तावलेली वाढ अनुभवत राजकारणात आलेल्या महाराष्ट्रातील त्या काळातील युवा पिढीने खासदार म्हणून आर्थिक क्रांतीचा बदलता काळ, मनमोहन सिंग यांची अर्थनीती आणि नरसिंहराव यांची राजनीती अनुभवली. त्याचा प्रभाव या बॅचच्या सगळ्याच महाराष्ट्रातील युवा खासदारांवर होता ज्यापैकी काहींनी पुन्हा महाराष्ट्रात परतत या राज्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक, कृषी आणि राजकीय विकासात मोठे बदल घडवले. त्यामुळेच अजित पवार आणि अर्थमंत्रीपद हे देखील महाराष्ट्रात अतूट नाते बनले. कधी तुकारामांचे अभंग सांगत अर्थसंकल्प सादर कर, कधी बहिणाबाईंच्या कविता आणि 18 पगड जातीच्या विकासाचा विचार मांड, राज्यातील मंदिरे, मशिदी इतर प्रार्थनास्थळांना, लाखोंची गर्दी जमणाऱ्या यात्रेच्या ठिकाणांना पर्यटन आणि अन्य कारणाने मदत कर, मांढरदेवी सारख्या दुर्घटनेनंतर मदतीला धाऊन जा आणि सगळी जबाबदारी पार पाड, त्याबाबतीत कायमचे धोरण ठरव अशी कामे ते करीत राहिले. कौशल्य विकास, कृषी वीज, औद्योगिक क्षेत्रे यांना मदत करण्यासाठी योजना आणि उत्पन्न वाढीचे नवे मार्ग सांगताना त्याचे जोरदार समर्थन करावे तर ते अजित पवारांनी. काकांच्या राजकारणातील गाभा जाणून सर्व जाती, जमाती, स्त्रिया, दुर्बलांच्यासाठी योजना आणाव्यात, त्यांना योग्य प्रतिनिधित्व देऊन नेतृत्वाची संधी द्यावी, युवकांना पुढे चाल द्यावी आणि आपल्या वयापेक्षा अधिकचे बोलले तर समज द्यावी ती दादानी. ‘पिंपरी चिंचवड’ सारखे शहर उभे करणारे खमके दादा, कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यागृह पडले तर ते जसेच्या तसे उभे करण्यासाठी अधिकाऱ्यांना बारकावे सांगणारे आणि निष्णात व्यक्ती जोडून देऊन काम त्यांच्याकडूनच करून घ्या, पैसे जादा लागले तरी वारसा टिकवायचा असे सांगणारे दादा. अलीकडे ते उद्धव ठाकरेंच्याप्रमाणे बोलू लागले. माझा महाराष्ट्र, माझी माणसं, माझे शेतकरी असे उच्चार त्यांच्या भाषणात येत. त्याचप्रमाणे बारामती परिसरातील सर्वसामान्य लोक आपली घरगुती भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती करायला दादांना सांगत. इतकी आपुलकी यापूर्वी वसंतदादा पाटील या एकाच दादा माणसाने महाराष्ट्रातील जनतेत मिळवली होती.  अलीकडच्या दीड दशकात विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाने जगाचा निरोप घेतला. हे लोक आज हवे होते असे लोक कळवळून बोलतात. अलीकडच्या काळात एक नाव पुढे आले होते ते म्हणजे अजितदादा पवार. काकांच्या शब्दाखातर संपूर्ण हयात त्यांच्या विचाराने राजकारण करायचे आणि सगळे करून मागच्या रांगेत उभे राहायचे हे काम अजित पवारांच्या नशिबी बहुदा लिहिलेले असावे. याच काळात प्रचंड टीका, आरोप आणि त्या निमित्ताने सत्तेपासून दूर करणारे राजकारणही त्यांनी शांतपणे अनुभवले. या काळात प्रसंगी कठोर बोलत, प्रसंगी छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकत आणि मोठ्या, मोठ्या नेत्यांना नजरेच्या धाकात ठेवत अजित पवार आपले राजकारण साधत होते. त्यांच्या राजकारणात जसा वक्तशीरपणा होता तसाच प्रामाणिकपणा आणि स्पष्टवत्तेपणा सुद्धा होता. त्याचे त्यांनी फटकेही सोसले. टीकाही झाली, आत्मक्लेशही करावा लागला. पण म्हणून अजितदादा लोकांच्या मनातून उतरले नाहीत. त्यांनी आपले स्थान कायम ठेवले. कधी कधी हसून ते ‘आपल्या नशिबी कायम उपमुख्यमंत्रीपदच आले’ या वास्तवाला सहज स्वीकारायचे. 2019 मध्ये त्यांनी आपली प्रतिमा बदलली. काकांच्या विचाराने राजकारण करणारा पुतण्या या प्रतिमेला जोराचा तडा देत स्वत:च्या पद्धतीने राज्य करू इच्छिणारा राज्यकर्ता बनण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. दादांनी तेव्हा माघार घेतली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. कोरोना काळात या दोघांची जोडी जोरदार चालली. आजारपणामुळे उद्धव ठाकरे यांना मर्यादा आलेल्या असताना अजितदादांनी एक हाती मंत्रालय सांभाळले. आदित्य ठाकरे यांना कामाची मोकळीक दिली. प्रसंगी त्यांच्यासोबत जाऊन मुंबईच्या विकासकामांना भेटी द्यायच्या, सरकारविरोधी टीकेला उत्तर द्यायचे काम त्यांनी केले. त्याचवेळी तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांची त्यांची दोस्तीही लोकांना विसरता आली नाही. यांच्याकडून होणाऱ्या टीकेनंतरही त्यांनी नवाब मलिकांची साथ सोडली नाही. एक वेळ पुन्हा त्यांनी उघड बंड केले. काकांना आता तुम्ही थांबले पाहिजे असे सुनावले आणि त्यांचेच निकटवर्तीय घेऊन आपले राजकारण पुढे नेले. दोन द्यायचे आणि दोन घ्यायची तयारी असलेल्या त्यांच्या राजकारणाला काळाची साथ मिळाली. काळाचे फासे त्यांच्या पद्धतीने पडले. त्यांची वाढ मग इतरांच्या डोळ्यात आली. या काळात मित्रपक्षाला उघड आव्हान देताना त्यांना काकांच्या पक्षाशी पुन्हा जुळवून घ्यायचे होते. आता त्या राजकारणाचाच अपघात झाला आहे. आज घराघरात अनेक स्त्रियांनी देखील दादांच्या श्रद्धांजलीचे स्टेट्स लावून त्यांना अखेरचा निरोप दिला. हसत खेळत राजकारण करणारे दादा असे हसत हसत काळाच्या पडद्याआड होरपळतील असे कधी वाटले नव्हते. अशा दिलदार माणसाला आदरांजली नव्हे अश्रूच वाहणे योग्य असते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.