For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दादा शेळकेने रशियाच्या जुबेरला घुटण्यावर‘अस्मान’

11:19 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
दादा शेळकेने रशियाच्या जुबेरला घुटण्यावर‘अस्मान’
Advertisement

ब्रम्हदेव कुस्ती संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान : फ्रान्सच्या विलियम्सचा प्रेक्षणीय विजय,मजगावच्या मल्लांनी दाखविला डंका, कार्तिक काटेची विजयाची घोडदौड कायम,

Advertisement

बेळगाव : श्री ब्रम्हदेव कुस्तीगीर संघटना मजगाव, हनुमान जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानात नवव्या मिनिटाला भारताच्या (महाराष्ट्र)च्या दादा शेळकेने रशियाच्या जुबेरला घुटणा डावावरती चीत करुन तर फ्रान्सच्या विलियम्सने भारताच्या (सांगली) सुबोध पाटीलला खालुन सवारी घालून लपेट डावावरती अस्मान दाखवून उपस्थित 25 हजारांहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी दादा शेळके व आंतरराष्ट्रीय मल्ल जुबेर रशिया ही कुस्ती जय भारत फौंडेशन व ब्रम्हदेव कुस्तीगीर संघटना मजगाव यांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला दादा शेळकेने एकेरीपट काढून जुबेरला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण खालून दशरंग फिरवून जुबेरने दादावर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

पण चलाखीने दादाने त्यातून सुटका करुन घेतली. तिसऱ्या मिनिटाला पुन्हा दादाने एकेरीपट काढून जुबेरला खाली घेत घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण बलंदड शरीराच्या 125 किलो वजना जुबेरला फिरविणे कठीण गेले. पण त्यातूनच खालून डंकी मारुन जुबेरने दादावर कब्जा मिळविला. पण त्यातहून शेळकेने सुटका करुन घेतली. आठव्या मिनिटाला दादाने पायाला टाच मारुन जुबेरवर कब्जा मिळवित पायाला एकलांगी बांधून तोंडाला नाकपट्टी लावून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून निसटून जाण्याचा प्रयत्न करत असताना दादाने जुबेरला पुन्हा मजबूत ताबा मिळवून घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण नवव्या मिनिटाला आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करुन घुटण्यावरती चारीमुंड्या चीत करुन आपली विजयी घोडदौड कायम राखत मजगाव कुस्ती शौकिनांची जिंकली.

विलियम्सने सुबोधला सवारीवर लपेटले  

दुसऱ्या क्रमांकाची लढत सुबोध पाटील-सांगली व आंतरराष्ट्रीय मल्ल विलियम्स फ्रान्स ही कुस्ती अहमद मजगाव, कृष्णा बिंदले व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला सुबोध पाटीलने हप्ते भरुन विलियम्सला खाली घेतले व पायाला एकलांगी भरुन तोंडाला नाकपट्टी लावून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण विलियम्सचा दुसरा खांदा जमिनीला न लागल्याने पंच बुद्दन्नावर यांनी कुस्ती न झाल्याचे घोषित केले. चौथ्या मिनिटाला सुबोधने विलियम्सला एकेरीपट काढून खाली घेतले व घिश्शा मारण्याचा प्रयत्न करत असताना खालुन दशरंग फिरवून विलियम्सवर ताबा मिळविला व सवारी भरुन सवारीवरती फिरविण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणी विलियम्सने आपला दुसरा खांदा जमिनीला टेकू दिला नाही. त्यामुळे पुन्हा कुस्ती खडाखडी सुरू झाली. अकराव्या मिनिटाला सुबोधने विलियम्सला खाली घेवून घिश्शा मारण्याचा प्रयत्न करत असताना विलिय्मसने सवारी घालून लपेट डावावर लपेटले आणि कुस्ती शौकिनांची मने जिंकली.

कार्तिकचे नेत्रदीपक विजय

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व संदीपकुमार हरियाणा यांच्यात मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला कार्तिक काटेने एकेरीपट काढून संदीपकुमारला खाली घेत पायाला मजबूत एकलांगी भरुन फिरविण्याचा प्रयत्न केला. संदीपकुमारने कार्तिकने घातलेली एकलांगी सोडविण्याचा प्रयत्न केला. पण  तिसऱ्या मिनिटाला एकलांगी डावावरती नेत्रदीपक विजय मिळवित आपली घोडदौड कायम राखली.

चौथ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोड

चौथ्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी व उमेश चव्हाण-कोल्हापूर ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. सातव्या मिनिटाला कामेशने उमेश चव्हाणला उचलून धोबीपछाड करण्याचा प्रयत्न केला. पण तो असफल ठरला. पुढे ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत सौरभ मुसळे-पुणे याने अवघ्या दीड मिनिटांत प्रेम जाधव-कंग्राळीला हप्ते भरुन चीत केले.

सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश हट्टीकर-कंग्राळीने रोहीत मुडले-पुणेला एकेरीपट डावावरती चीत केले. सातव्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील-कंग्राळी व मजीद शेख कुडुवाडी ही कुस्ती जवळपास 20 मिनिटे झुंजली. वेळेअभावी कुस्ती बरोबरीत राहिली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत कुणाल हरियाणा व पृथ्वीराज पाटील-कंग्राळी यांच्यात झाली. या कुस्तीत कुणालने एकेरीपट काढून पृथ्वीराजला जोरदार खाली घेतले. त्यामुळे त्याला दुखापत झाल्याने कुणाल हरियाणाला विजयी घोषित केले. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत निखिल कंग्राळीने सिद्धारुढ धारवाडचा घिश्शावर पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या

कुस्तीत प्रथम करडीकोप्प धारवाडने

महेश तीर्थकुंडयेला एकलांगी डावावरती पराभव केला. त्याचप्रमाणे विकास चापगाव, हनुमंत गंदिगवाड, ध्रुव मण्णिकेरी, भूमीपुत्र मुतगा, हर्ष कंग्राळी, बाळू मजगाव, प्रणाव उचगाव, ओम हिप्परकर-हंडे तालिम, श्रीराज कंग्राळी, श्री घाडी, हर्ष मजगाव, सतबा -तिउरवाडी, सोपन तुर्केवाडी, प्रताप खादरवाडी, आदर्श कडोली, बाळकृष्ण संतीबस्तवाड, गुरूनाथ तिऊरवाडी, पवन खादरवाडी, अरविंद्र शवणगेकर, अशरफ मजगाव यांनी आपाल्या प्रतिस्पर्धांवरती नेत्रदीपक विजय मिळविले. आकर्षक लढतीत आर्यन मुतगा, रिदांत मजगाव, अफान मजगाव, आरव निट्टूर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून चषक पटकाविले.

आखाड्याचे पंच म्हणून सुधीर बिर्जे, शिवाजी पट्टण, चेतन बद्दन्नावर, मल्लाप्पा मजुकर, कृष्णा पाटील-कंग्राळी, राजू मजुकर, नवीन मुतगे, अतुल शिरोळे, ठेकेदार बाळाराम पाटील, गणपत बन्नोशी, पिराजी मुचंडीकर, नारायण मुचंडीकर, प्रशांत पाटील, भाऊ पाटील, प्रकाश तीर्थकुंडये, एम. जी. मणतुर्गी, शंकर पाटील, बबन येळ्ळूर यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले-राशिवडे यांनी केले.  कृष्णा यांनी आपल्या रणालगीच्या तालावर आपल्या साथीदारांसह सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.

महिला मल्लांची कुस्ती ठरली आकर्षण

महिलांच्या प्रमुख लढतीत राधिका संतीबस्तवाड व भाग्यश्री (स्पोर्ट्स हॉस्टेल) ही कुस्ती डॉ. तेजश्री अनगोळकर व इतर महिलांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला भाग्यश्रीने राधिकावर एकेरीपट काढून कब्जा मिळविला व घिश्शावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून राधिकाने सुटका करुन घेतली. पाचव्या मिनिटाला भाग्यश्रीने राधिकाला पायाला अकडी लावत खाली घेतले व खालून डंकी मारुन राधिकाने भाग्यश्रीवर कब्जा मिळवत एकचाक फिरविण्याचा प्रयत्न केला.भाग्यश्रीने त्यातुन सुटका करुन घेतली. ही लढत जवळपास 20 मिनिटे झुंजली. वेळेअभावी बरोबरीत राहिली. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रभा खादरवाडी व कल्याणी वाघवडे ही कुस्ती बरोबरीत राहिली.तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत शिवानीचा झोळी डावावरती पराभव केला.चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती खुशीने ऋतुजा रावळचा एकचाक डावावरती पराभव केला.सुश्मिताने स्वाती चतुरचा मोळी डावावरती पराभव केला.स्वराली मजुकर,अराध्या येळ्ळूर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला.

Advertisement
Tags :

.