दादा मडकईकर यांच्या ‘सुरगेंचो वळेसार’ चे २६ रोजी प्रकाशन
सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या ‘सुरगेंचो वळेसार’ या ४५० म्हणी, मालवणी कवितासंग्रहांचे प्रकाशन मुंबई येथे पु. ल. देशपांडे साहित्य अकादमी, प्रभादेवी येथे सोमवार २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.कवी गोविंद मधुकर उर्फ दादा मडकईकर हे सावंतवाडीचे\ सुपुत्र असून मालवणी स्वरचित कवितांसाठी त्यांची ख्याती आहे. रम्य निसर्गाचा शोध, वेध घेत भ्रमण करणे हा त्यांचा छंद आहे.निसर्ग वाचनातून त्यांची प्रतिभा बहरली. काव्याला शास्त्रीय रागदारीत चाल लावून आपल्या सुरेल आवाजात रसिकांसमोर सादर करणे हा त्यांचा आवडता छंद बनला. मराठी पाठ्यपुस्तकातील अनेक संस्कारक्षम कवितांचे गायन त्यांनी केले आहे. अलिकडे झालेल्या सिंधुदुर्ग साहित्य संघाच्या कोजागरी कवी संमेलनचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले होते. अनेक संमेलनातून त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत.दादांची कविता ऐकणे म्हणजे रसिकांसाठी पर्वणी असते. त्यांनी आपल्या रोजच्या जगण्यातील मालवणी म्हणींचा संग्रह केला. तो आता पुस्तकरूपात येत आहे.