For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिंदेंपेक्षा दादाच भाजपला उपद्रवी

06:47 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिंदेंपेक्षा दादाच भाजपला उपद्रवी
Advertisement

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा  फॉर्म्युला आज अंतिम होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे महायुतीत कोणाला किती जागा याबाबतच्या कोणत्याच फॉर्म्युल्यावर चर्चा न होता भाजपने पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी तर अजित पवार गटाने बारामतीतून सुनेत्रा पवार, शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा न झाल्याने शिंदेंपेक्षा अजित पवार हेच भाजपवर दबावतंत्रात भारी पडणार यात शंका नाही.

Advertisement

महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षात कधी नव्हे ती राजकीय समीकरणे बदलली असून लोकसभा निवडणुकीत तीन तीन प्रमुख पक्ष युती आणि आघाडीत लढणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत थेट हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष अशी युती आणि आघाडीत लढत होत होती. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाचे विभाजन झाल्याने जागा वाटपाचा सध्या चांगलाच तिढा निर्माण झाला आहे. भाजपने आपली राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्याला आठ दिवस झाल्यानंतरही अद्याप सोबतच्या पक्षांबाबत संभ्रम कायम आहे. एकीकडे महाआघाडीच्या जागा वाटपाबाबत बैठकांवर बैठका होत आहेत, विशेष म्हणजे काल शिवाजी पार्कवर सभा घेत इंडिया आघाडीने आपल्या लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील रणशिंग फुंकले.

या सभेला इंडिया आघाडीतील देशातील सर्व नेते सभेला उपस्थित होते, त्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश होता. आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गट हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. कारण ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती असून ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती असून चार जागा वंचितला देणार असल्याचे समजते. मात्र त्या कोणत्या आणि कोणाच्या वाट्यातून असणार हे नक्की होणे बाकी आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे आणि भाजपला महाराष्ट्रात 45 प्लसपासून रोखणे हा एकमेव उद्देश असल्याने राज्यातील महाविकास आघाडीत सध्या तरी एकवाक्यता दिसत आहे.

Advertisement

या उलट भाजपला कोणत्याही प्रकारे 400 पारचा नारा पूर्ण करताना एक हाती सत्ता मिळविणे आणि या राज्यातील सत्तेत सर्वाधिक वाटा हा भाजपचा राहण्यासाठी भाजपकडून कधीही मोठ्या धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो. इतर अनेक राज्यात भाजपचे स्वबळावर सरकार आले, मात्र राज्यात 2014 आणि 2019 ला मोदी लाट असताना आणि उध्दव ठाकरेंची शिवसेना सोबत असताना देखील विधानसभा निवडणुकीत 144 चा आकडा गाठता आला नाही. आता तर ‘ना ठाकरेंची शिवसेना सोबत’, ‘ना राज्यात अनुकुल वातावरण’ त्यामुळे भाजपला लोकसभेसाठी 45 प्लसचा आकडा गाठणे कठीण असणार आहे, असेच सध्याला तरी भासते आहे.

त्यातच राज्यातील जनतेचा कौल हा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा भाजपकडे असल्याचा सर्वेक्षण अहवाल आल्याने भाजप आपल्या सोबतच्या दोन पक्षांबाबत फारसे पजेसिव्ह नसल्याचेच दिसत आहे. आता भाजपसोबतच्या जागा वाटपात, भाजप ठरवणार कोणाला किती जागा सोडायच्या, कोणाचा किती फायदा होणार? त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात आता आपला उपद्रव दाखविण्याची स्पर्धा लागणार यात शंका नाही. भाजपवर दबाव आणण्यासाठी ही खेळी खेळली जाणार. नुकताच बारामतीतून विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर शिंदे गटाने ठाण्यात राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देऊ इशारा दिला आहे.

या सर्व खेळात शिवसेना आणि राष्ट्रवादीतच आता ‘तू तू मै मै’ होऊ लागली आहे. अजित दादांचा स्वभाव बघता दादा वेळ आल्यास भाजपकडून काय आणि किती घ्यायचे हे जाणुन आहेत. सत्तेत सहभागी होताना शिवसेनेपेक्षा अधिक लोकांना मंत्री पदे घेतच दादा सत्तेत सहभागी झाले, दादा यशस्वी झाले, दादांच्या सहकाऱ्यांनी ठरवले तर भाजपच्या उमेदवाराला ते पाडू शकतात इतका दादांसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रभाव मतदार संघात आहे. यात एकनाथ शिंदे कमी पडतात. शिंदेंसोबत किती आले यापेक्षा ते भाजपला कीती तारक आणि मारक असू शकतात, यावरच शिंदेंच्या शिवसेनेसाठी राजकीय गणिते ठरली जातील. प. महाराष्ट्रात जसा काही मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रभाव तसा शिंदेंचा मुंबई-ठाण्यातही नाही आणि जिथे शिंदेंचा प्रभाव आहे तिथे भाजपही स्ट्राँग असणे हीच शिंदेंसाठी खरी डोकेदुखी आहे. माढा लोकसभा मतदार संघात जर रामराजे नाईक निंबाळकरांनी विरोध कायम ठेवला तर रणजितसिंह निंबाळकरांना ते सहज अस्मान दाखवू शकतात.

इथे भाजपची ताकदच नाही, इथे दादांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यात अकलुजच्या मोहिते-पाटलांनी विरोध कायम ठेवला तर रामराजेच भाजपला तारू शकतात. मात्र एकनाथ शिंदेंकडे असे रामराजे नसल्यानेच शिंदे लोकसभेच्या जागावाटपाच्या तहात कमी पडले.

आता ठाणे, पालघर, कल्याण या भागात भाजप शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर गेली अनेक वर्षे भाजपसोबत युतीत आणि सत्तेतही असल्याने या भागात भाजपचाही चांगलाच  बेस आहे, तो 2014 नंतर चांगलाच भाजपने वाढवला. त्यामुळे भाजपला इथे शिंदेंवर अवलंबून राहण्याची गरज नाही. 2014 ला भाजपने शिवसेनेच्या विरोधात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविताना शिवसेनेपेक्षा जास्त जागा याच मुंबई, ठाणे भागातून जिंकल्या होत्या.  त्यामुळे भाजप या भागात शिंदेंना अंडर इस्टीमेट करणार आणि स्वत:चेच उमेदवार देणार किंवा शिंदेंच्या उमेदवारांना भाजपच्या अटी आणि शर्थी लागू राहतील यात शंका नाही. ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचे नाव पुढे येत असले तरी फाटक यांच्याऐवजी विनय सहस्त्रबुध्दे, गणेश नाईक, संजीव नाईक किंवा ऐनवेळी संजय केळकर यांनाही भाजपची उमेदवारी मिळू शकते.

ठाणे लोकसभा मतदार संघात मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार तर भाजपचे 4 तर शिवसेनेचे दोन आमदार आहेत, मग ठाण्याची जागा भाजप शिवसेनेला कशी सोडेल हा खरा प्रश्न आहे. भाजपने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत जनतेत नाराजी आहे. त्या तुलनेत भाजपने निवडणूक लढविल्यास भाजपला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे, याच शक्यतेने भाजप शिंदे आणि अजित पवार गटाला किती जागा सोडेल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र राज्यातील अनेक लोकसभा मतदार संघांचा विचार करता शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा भाजपला अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक मतदार संघात उपद्रवी ठरू शकते.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.