For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे 7 ऑक्टोबरपासून कोकण दौऱ्यावर; शाळांना थेट भेटी देत ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा घेणार आढावा

12:20 PM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे 7 ऑक्टोबरपासून कोकण दौऱ्यावर  शाळांना थेट भेटी देत ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा घेणार आढावा
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे 7 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर राहणार आहेत. या दौऱ्यात ते विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शाळांची स्थिती, शैक्षणिक गुणवत्ता तसेच ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत.

Advertisement

मंत्रालयातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत दौरा कार्यक्रमानुसार, 7 ऑक्टोबर रोजी मंत्री भुसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असतील. सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत त्यांच्या शाळा भेटींचा कार्यक्रम आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीला विभागीय उपसंचालक, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

रत्नागिरीतही शाळांना भेटी

8 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा दौरा राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना भेटी दिल्यानंतर दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद सभागृहात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा आढावा घेण्यात येणार आहे.

यानंतर मंत्री भुसे रेल्वेने पनवेलमार्गे अलिबागकडे रवाना होतील.

रायगडनंतर नाशिककडे रवाना

9 ऑक्टोबर रोजी सकाळी अलिबाग येथील जिल्हा परिषद सभागृहात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी शाळा भेटीचा कार्यक्रम होणार आहे. पुढे पनवेल येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर मंत्री भुसे नाशिककडे रवाना होतील.

या दौऱ्यात प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन विद्यार्थी पटसंख्या, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांची उपलब्धता, शाळांमधील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

कोकणातील जिल्हा परिषद शाळांसमोरील विविध अडचणी आणि स्थानिक पातळीवरील शैक्षणिक प्रश्नांवर शिक्षण मंत्र्यांकडून थेट चर्चा होणार असल्याने शिक्षण विभाग तसेच शिक्षकवर्गाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.