डाबर इंडियाला मागणी वाढण्याची आशा
डाबरचे चेअरमन मोहित बर्मन यांचा दावा : विविध लोकप्रिय उत्पादने
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रात कार्यरत असणारी डाबर इंडिया कंपनीला चालू आर्थिक वर्षात हळूहळू त्यांच्या वस्तुंना मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. डाबरचे चेअरमन मोहित बर्मन यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीला अपेक्षा आहे की तिचा ‘पॉवर’ ब्रँड दुर्गम भागात विस्तारत असल्याने मागणीत वाढ होईल. कंपनीच्या अलीकडील वार्षिक अहवालानुसार, डाबरला ग्रामीण भागात विक्रीत सुधारणेची अपेक्षा आहे, जिथे ती तिचा विस्तार सुरूच ठेवणार आहे. अधिक प्रीमियम ऑफर जोडून आणि शहरी बाजारपेठांसाठी लगतच्या श्रेणींमध्ये प्रवेश करून आपली उपस्थिती वाढवेल. कंपनीच्या भागधारकांना संबोधित करताना बर्मन म्हणाले, ‘सामान्य मान्सून, मॅक्रो इकॉनॉमिक निर्देशकांमध्ये सुधारणा, पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्च चालू राहणे आणि कमी चलनवाढीचा अंदाज यामुळे पुढील वर्षी उपभोगाच्या ट्रेंडमध्ये हळूहळू वाढ होण्याची आम्हाला आशा आहे.
या उत्पादनांचे योगदान
डाबरच्या आठ प्रमुख पॉवर ब्रँडमध्ये डाबर च्यवनप्राश, डाबर हनी, डाबर हनीटस, डाबर पुदिनहारा, डाबर लाल तेल, डाबर आमला, डाबर रेड टूथपेस्ट आणि रियल ज्यूस यांचा समावेश आहे. वाटिका हा डाबरचा आंतरराष्ट्रीय पॉवर ब्रँड आहे. या उत्पादनांना ग्राहकांची चांगली मागणी काही वर्षापासून राहिली आहे. त्यामुळे एकंदर विक्रीत या उत्पादनांचे योगदान नोंदणीय असेच आहे.