For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाबोळी, मोपा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा ई-मेल

12:02 PM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
दाबोळी  मोपा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा ई मेल
Advertisement

तपासणीअंती ती अफवाच ठरली : विमानतळांवरील वाहतूक सुरुच

Advertisement

वास्को : दाबोळी विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाला मिळाल्याने या विमानतळावर पुन्हा एकदा सुरक्षेसाठी धावपळ उडाली. सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली व कडक तपासणीही करण्यात आली. मात्र, कुठेच बॉम्ब किंवा विस्फोटक पदार्थ आढळून आला नाही. त्यामुळे बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती केवळ अफवा पसरविण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले. असाच प्रकार मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही घडला. अधिक माहितीनुसार सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव यांना दाबोळी, मोपा विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेलद्वारे अज्ञाताकडून मिळाली. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाला पूर्ण खबरदारी घ्यावी लागली. सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणांना या ई-मेलसंबंधी माहिती देऊन त्यांना तातडीने पाचारण करण्यात आले.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, गोवा पोलीस, दहशतवाद विरोधी पोलीस व श्वानासह बॉम्ब निकामी करणारी पथकही विमानतळावर दाखल झाले. अग्नीशामक दल व रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आली. तसेच विमानतळ व विमानतळाच्या आवारात कडक तपासणी करण्यात आली. मात्र, संशयास्पद असे कुठे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे तो ई मेल अफवा आणि घबराट पसरविण्यासाठीच पाठविण्यात आल्याचे उघड झाले. सदर ईमेलसंबंधी चौकशी सुरू करण्यात आलेली असल्याचे विमानतळ संचालक धनंजय राव यांनी सांगितले. बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरली तरी दाबोळी व मोपा विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली होती. या माहितीचा कोणताच परिणाम विमानतळावरील व्यवहारांवर झाला नाही. मोपावरील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळालाही अशाच प्रकारचा ई मेल आल्याची माहिती विमानसूत्रांकडून मिळाली. दाबोळी विमानतळ प्राधिकरणाला मागच्या वर्षभरात यापूर्वी दोन वेळा अशाच प्रकारे विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई मेल आला होता. तेव्हाही खळबळ उडाली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.