For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाबोळी विमानतळ कधीच बंद होणार नाही : मुख्यमंत्री

12:56 PM Feb 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
दाबोळी विमानतळ कधीच बंद होणार नाही   मुख्यमंत्री
Advertisement

यापूर्वी अनेकवेळा केंद्र, राज्य सरकाकडून स्पष्ट :राजकीय हेतूने विरोधकांकडून लोकांची दिशाभूल

Advertisement

पणजी : दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ कधीच बंद होणार नाही आणि केंद्र सरकार तो बंद करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा दिली आहे. कोणी दबाव आणला म्हणून दाबोळी विमानतळ बंद करता येत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. डॉ. सावंत यांनी सांगितले की, विरोधी पक्षांकडे कोणताही विषय किंवा मुद्दा नसल्यामुळे दाबोळीचेच घोडे पुढे काढण्यात येत आहे. तोच प्रश्न वारंवार उकरुन काढण्यावर विरोधी पक्ष जास्त भर देत असून त्यात काहीच तथ्य नाही. विरोधकांकडून विमानतळाचा विषय पुन्हा पुन्हा उकरुन काढणे अर्थहिन असून गोवा राज्याला पर्यटनाच्या व इतर सोयी सुविधांसाठी दोन विमानतळांची गरज आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, असे डॉ. सावंत यांनी पुन्हा म्हटले आहे.

केवळ विरोधकांचा डाव

Advertisement

निवडणूक जवळ येत असल्यामुळेच विरोधी पक्षाचे आमदार विविध प्रकारचे निरर्थक विषय पुन्हा पुन्हा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. दाबोळी विमानतळाच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा विरोधकांचा डाव असून तो कधीच सफल होणार नाही. दाबोळी विमानतळाचा वापर नौदल, नागरी वाहतुकीसाठी चालू राहणार असून त्यात कोणताही बदल होणार नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील दाबोळी विमानतळ बंद होणार नसल्याचे आश्वासन दिले असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

खासदार फर्नांडिस यांचा राजकीय हेतू

काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस हे दिल्लीमध्ये संसदेबाहेर दाबोळीबाबत बेजबाबदार विधाने करतात. राजकीय लाभ मिळवणे हा त्यामागे हेतू असल्याची टीका डॉ. सावंत यांनी केली आहे. इतर विरोधी पक्षीय आमदारही तोच विषय विनाकारण काढत असून दाबोळी विमानतळ बंद होणार नसल्याची ग्वाही यापूर्वी केंद्रासह राज्य सरकारने दिली आहे. तरीदेखील हा विषय पुन्हा उपस्थित करुन जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. जनतेने त्याकडे दुर्लक्ष करावे, असे डॉ. सावंत यांनी पुढे नमूद केले. दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीस कधीच बंद होणार नाही असा ठराव केंद्रीय मंत्रीमंडळाने यापूर्वीच संमत केल्याने तो बंद होण्याबाबत कोणताही प्रश्नच उद्भवत नाही, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. खासदार फर्नांडिस यांनी या प्रश्नावर संसदेचा अपमान केल्याची टीकाही डॉ. सावंत यांनी केली.

खासदार विरियातो फर्नांडिस करतात जनतेची दिशाभूल

दाबोळीचा विमानतळ बंद पडणे शक्य नाही. मात्र, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस गोव्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. जनतेमध्ये भिती निर्माण करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे. खासदार फर्नांडिस हे दाबोळी विमानतळाच्या नावाने चुकीच्या माहितीद्वारे जनतेमध्ये भिती पसरवीत आहेत. निवडणुका जवळ येताच ते अशी कामे करतात. दाबोळी विमानतळासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे व मंत्री माविन गुदिन्हो यांनी अनेक बैठका घेतलेल्या आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकारकडून दाबोळी विमानतळ कधीच बंद होणार नाही असे स्पष्ट आश्वासन मिळालेले आहे. तरीही जनतेमध्ये भिती निर्माण करण्यासाठी विरोधी नेत्यांकडून उपद्व्याप करण्यात येत आहेत अशी टीका आमदार आमोणकर यांनी केली.

-आमदार आमोणकर

Advertisement
Tags :

.