दबंग दिल्ली-पुणेरी पलटन आज जेतेपदासाठी लढत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत शुक्रवारी येथील त्यागराज इनडोअर स्टेडियममध्ये दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. 2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली या दोन्ही संघांच्या वाटचालीमध्ये बरेच साम्य आढळते. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हे दोन संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिल्याने त्यांच्यात आता जेतेपदासाठी लढत चुरशीची अपेक्षित आहे. पहिल्या क्वॉलीफायर सामन्यात दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा टायब्रेरकरमध्ये नाट्यामयरित्या 6-4 अशा गुणांनी पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 34-34 असे बरोबरीत होते. आशु मलिकच्या नेतृत्वाखाली दबंग दिल्लीने या सामन्यात सुरूवातीपासून ते अखेरपर्यंत आपली पकड मजबूत राखली होती. तर दुसऱ्या क्वॉलीफायर सामन्यात पुणेरी पलटनने सुरूवातीला पिछाडीनंतर मुसंडी मारत तेलुगू टायटन्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेच्या इतिहासात गेल्या चार हंगामात पुणेरी पलटनने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
अजय ठाकुरच्या मार्गदर्शनाखाली तसेच अस्लमच्या इनामदाराच्या कुशल नेतृत्वाखाली पुणेरी पलटनने प्राथमिक लीग टप्प्यात गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. आतापर्यंत पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली यांच्यात तीनवेळा सामने झाले असून ते सर्व सामने टायब्रेकरपर्यंत लांबले. आता शुक्रवारच्या सामन्यात हे दोन्ही संघ प्रतिस्पर्धी संघांची मर्यादा ओळखतील. दबंग दिल्लीची भिस्त प्रामुख्याने आशु मलिकच्या हुकमी चढायांवर राहील. शुक्रवारचा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने दबंग दिल्लीला पुणेरी पलटनच्या तुलनेत विशेष कठीण जाणार नाही. दबंग दिल्लीमध्ये फजल अत्राचेली, सौरभ नंदाल आणि आशु मलिक हे अनुभवी कबड्डीपटू आहेत. मात्र 12 व्या प्रो कबड्डी लीग हंगामात पुणेरी पलटनच्या कामगिरीत सातत्य पहावयास मिळत आहे. या संघामध्ये युवा कबड्डीपटूमधील शिस्त आणि क्षमता वाखाळण्यासारखी आहे. आदित्य शिंदे, इस्लम इनामदार ही या संघातील प्रमुख हुकमी खेळाडू आहेत. त्यांची बचावफळी भक्कम असल्याने शुक्रवारच्या सामन्यात पणेरी पलटन सांघिक कामगिरीवर अधिक भर देईल.