डि-मार्टच्या नफ्यात वाढ
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
डि-मार्ट रिटेलची साखळी चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्टने आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीने मार्चच्या तिमाहीत 19 टक्के वाढीसह 551 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे.
17684 कोटीचा महसूल
डिसेंबर तिमाहीपेक्षा मार्चमध्ये नफा 23 टक्के अधिक राहिला आहे. याचदरम्यान कंपनीचा एकत्रित महसूल 19 टक्के वाढीसह 17684 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 14872 कोटींचा महसूल कंपनीने मिळवला होता. मार्चमध्ये सुरुवातीला ग्राहकांची संख्या युद्धाच्या तणावामुळे कमी होती पण महिन्याच्या अखेरच्या दिवसात ग्राहक संख्या वाढली होती.
चौथ्या तिमाहीत कंपनीने 58 नव्या स्टोअर्सची सुरुवात केली असून स्टोअर्सची संख्या 500 पार पोहचली आहे. 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी पार केलेल्या स्टोअर्सनी तिमाहीत 10 टक्के इतकी विक्रीत वाढ दर्शवली आहे.
व्यवसायात स्थिरता
एकंदर तिमाहीचा अवधी रिटेल व्यवसायाकरिता शाश्वत स्वरुपाचा राहिला आहे. कंपनीचा दर तिमाहीमागचा नफाही बऱ्यापैकी स्थिर राहिला आहे. पश्चिम आशियातील तणाव असताना डि-मार्ट रिटेलला होणाऱ्या वस्तुंच्या पुरवठा साखळीवर कोणताही परिणाम जाणवलेला नव्हता, असेही कंपनीने म्हटले आहे.