डी. के. शिवकुमार हिमाचल काँग्रेसचे प्रभारी
हायकमांडचा महत्त्वपूर्ण निर्णय
बेंगळूर : काँग्रेस हायकमांडने हिमाचल प्रदेश राज्य काँग्रेस प्रभारी म्हणून कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला. हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे सहा आमदार फुटल्याने तेथील सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. शिवाय क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांसह एकूण 9 आमदार सध्या हरियाणातील पंचकुला येथे आहेत. त्यामुळे हे सरकार टिकून राहते की नाही, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर तेथील सरकार शाबूत ठेवण्याच्या उद्देशाने आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हायकमांडने डी. के. शिवकुमारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत शिवकुमार यांनी निभावलेली जबाबदारी विचारात घेऊन त्यांना हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे.