डी. के. शिवकुमार यांचे दिल्लीतच ठाण
आजचा दावोस दौरा अचानक रद्द : कुतूहलात भर
प्रतिनिधी/ बेंगळूर
आसामसह इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दिल्लीत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी कसरत करत असलेल्या शिवकुमार यांनी रविवारचा दावोस दौरा रद्द केला असून दिल्लीतच ठाण मांडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहलात भर पडली आहे.
शुक्रवारी दिल्लीत आसाम विधानसभा निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीला डी. के. शिवकुमार यांनी हजेरी लावली. त्यांनी राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट शक्य झाली नाही. परंतु, पक्षाचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. तर शनिवारी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन राजकीय विषयांवर चर्चा केली आहे.
माजी मंत्री भीमण्णा खंडे यांचे निधन झाल्याने अंतिम दर्शन घेण्यासाठी शनिवारी दुपारी शिवकुमार हे दिल्लीहून हैदराबादमार्गे बिदरला आले. भीमण्णा खंडे यांच्या अंत्यविधीत सहभागी झाल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला रवाना झाले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी रविवारचा नियोजित दावोस दौरा रद्द केला आहे. अधिकार वाटपासंबंधी काँग्रेस हायकमांड स्तरावर रविवारी किंवा सोमवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. दावोस दौरा रद्द करून दिल्लीत राहण्याचा निर्णय शिवकुमारांनी घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
18 जानेवारी रोजी स्वित्झर्लंडच्या दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद होणार आहेत. त्यात सहभागी होण्याचा निर्णय शिवकुमारांनी घेतला होता. मात्र, त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला आहे. बेंगळूर आणि नवी दिल्ली येथील अधिकृत कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा विदेश दौरा रद्द झाला आहे, असे त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात उल्लेख आहे.
परंतु, आसाम, पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांवर काँग्रेसश्रेष्ठींनी लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यासाठी दिल्लीत पक्षातील नेत्यांच्या बैठका हेत आहेत. त्याचप्रमाणे मनरेगा योजना पुन्हा जारी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन तसेच मनरेगासंबंधी चर्चा करण्यासाठी 22 जानेवारीपासून बेंगळुरात विधिमंडळाने विशेष अधिवेशन होत असल्याने शिवकुमारांनी दावोस दौरा रद्द केल्याचे सांगितले जात आहे.
21 रोजी सतीश जारकीहोळी दिल्लीत

राज्यात नेतृत्व बदलासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडून दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटाकडूनही रणनीती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दिल्लीत मंत्री के. जे. जॉर्ज यांनी वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आता 21 रोजी मंत्री सतीश जारकीहोळी देखील दिल्लीला जाणार आहेत. त्यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एआयसीसीचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांची ते भेट घेणार आहेत.