डी. के. शिवकुमारांविरुद्ध भाजपची आयोगाकडे तक्रार
प्रतिनिधी/ बेंगळूर
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. मंत्री आणि आमदारांच्या कार्यालयात राजकीय घडामोडी सुरू आहेत. हे निवडणूक समितीचे उल्लंघन असल्याची तक्रार भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसौध हे काँग्रेसचे कार्यालय मानले असल्याचे दिसत आहे. शनिवारी 30 मार्च रोजी विधानसौध कार्यालयात नजमा नजीर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शिवकुमार यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. जबाबदारीच्या पदावर त्यांनी सरकारी कार्यालयाचा पक्षकार्यासाठी वापर करणे चुकीचे आहे, असे भाजपने तक्रारीत म्हटले आहे.
राज्याचे मुख्य सचिव रजनीश गोयल यांच्यासमोरच हा कार्यक्रम झाला असला तरी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांनी दाखवलेली निष्क्रियता चिंताजनक आहे, असा उल्लेख भाजपने तक्रारीत केला आहे. मंत्री आणि आमदारांना विधानसौध कार्यालयात राजकीय घडामोडी करण्यास प्रतिबंधित केले पाहिजे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. भाजपचे आमदार एस. सुरेशकुमार, टी. के. राममूर्ती, मुख्य प्रवक्ते अश्वथनारायण, राज्य प्रवक्ते एस. प्रकाश यांच्यासह अनेक नेते या शिष्टमंडळात होते.