गोव्यातील फिडे वर्ल्ड कप स्पर्धेत डी गुकेशला अग्रमानांकन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश 30 ऑक्टोबरपासून गोवामध्ये सुरू होणाऱ्या फिडे वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडू असेल. भारताच्याच अर्जुन एरिगेसी व आर. प्रज्ञानंद यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन देण्यात आले आहे.
27 नोव्हेंबर रोजी संपणाऱ्या या स्पर्धेत अनेक आघाडीचे स्टार बुद्धिबळपटू सहभागी झाले असून डेन्मार्कच्या अनीश गिरीला चौथे स्थान देण्यात आले आहे. एकूण 2 दशलक्ष डॉलर्स असे भक्कम बक्षीस ठेवण्यात आले असून जगभरातील 206 खेळाडू त्यात सहभागी होणार आहेत. भरघोस बक्षिसाबरोबरच 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी तीन स्थानेही खेळाडूंना पटकावता येणार आहेत. गोव्यातील स्पर्धेत अव्वल तीन स्थान पटकावणारे खेळाडू कँडिडेट्स स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत. अमेरिकेच्या वेस्ली सो याला येथे पाचवे स्थान देण्यात आले असून व्हिन्सेन्ट केमर, वेइ यी, नादिरबेक अब्दुसत्तोरोव्हृ शाख्रियार मॅमेद्यारोव्ह व हान्स नीमन यांना त्यानंतरचे मानांकन मिळाले आहे.
यावेळी पुरुषांसाठी वेगळी वर्ल्ड कप स्पर्धा घेतली जात असून गेल्या जुलैमध्ये महिलांची वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली आहे. त्यात भारताच्या दिव्या देशमुखने आपल्याच देशाच्या कोनेरू हंपीचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. दिव्याला जेतेपदाबरोबरच ग्रँडमास्टर किताब व 2026 मधील महिलांच्या कँडिडेट्स स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे.