For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डी. एड. विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा

06:31 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
डी  एड  विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा
Advertisement

केएसईई बोर्डाचा गलथान कारभार : विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : गेली दोन वर्षे डी. एड. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेबाबत मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. केएसईई बोर्ड न्यायालयाचे कारण पुढे करीत सहा सहा महिने परीक्षा पुढे ढकलत आहे. यामुळे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

Advertisement

बोर्डाचे संचालक गोपाळकृष्ण हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. 2025-26 या मागील डी. एड. शैक्षणिक वर्षाचे सत्र 19 एप्रिल 2026 रोजी संपले तरी बोर्डाने अजून परीक्षेचा फॉर्मसुद्धा भरून घेतलेला नाही. वास्तविक या परीक्षा मे महिन्यात होणे गरजेचे होते. कर्नाटक सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन वेळा घेतल्या. विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेशही घेतला आणि त्यांची कॉलेजीस नियमित सुरू देखील झाली आहेत.

हजारो विद्यार्थ्यांची अतिथी शिक्षक होण्याची संधी हुकली

सन 2026-27 सालासाठी डी. एड. अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र 15 जून 2026 पासून सुरू झाले आहे. तरीसुद्धा बोर्डाने अजून मागील विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरलेले नाहीत. यामुळे द्वितीय वर्षाची परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची अतिथी शिक्षक होण्याची संधी हुकली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून बोर्डाबाबतची नाराजी वाढली आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा

शिक्षक होण्याचे स्वप्न घेऊन शेकडो विद्यार्थी दरवर्षी डी. एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात, परंतु अधिकारी वर्गाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement

.