दि. बा. पाटील यांना जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा जीवन गौरव
सांगली :
मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा जगद्गुरू तुकोबाराय जीवन गौरव पुरस्कार कामेरी (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांना देण्यात येणार आहे. शनिवार २१ डिसेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा सांगली येथे होईल. अशी माहिती परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने दरवर्षी ज्येष्ठ साहित्यिकांचा जगद्गुरू तुकोबाराय जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार सोहळा शनिवार २१ रोजी दुपारी अडीच वाजता सांगली येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी, मराठा सेवा संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष व म्हैसाळ पंपगृह विभाग क्र.२ सांगलीचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्य संघटक डॉ. श्रीकांत पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
या पूर्वी हा पुरस्कार कवठेमहांकाळ येथील ज्येष्ठ साहित्यिक शाहीर राजा पाटील व सांगली येथील ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील, इस्लामूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील यांना यांना देण्यात आला आहे. यावर्षी २०२४ चा पुरस्कार दि. बा. पाटील यांना देण्यात येणार आहे.
दि. बा. पाटील यांचे नाव महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिकांमध्ये घेतले जाते. आतापर्यंत त्यांची वादळ, वेदना, रक्तबंध, मंतरलेली मनं, होकार, प्रतिस्पर्धी, डियर मॅडम, झुंज, मास्तर, घामाचे अश्रू, सावलीचं घर उन्हात या कादंबर्या, विसावा, हिरवा चुडा, वाल्या, नोटबंदी हे कथासंग्रह, भली माणसं हे व्यक्तीचित्र अशी सुमारे १६ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा बी. रघुनाथ पुरस्कार मिळाला. त्यांच्या सर्व पुस्तकांना राज्यभरातील विविध संस्थांचे मानाचे सुमारे शंभरभर पुरस्कार मिळाले आहेत. गावाकडच्या मातीतला ओलावा आणि सुगंध त्यांच्या साहित्यातून दरवळतो. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, कष्टकर्यांच्या वेदना त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या आहेत. परिवर्तनशिल, सर्जनशिल साहित्यिक म्हणून त्यांची देशभर ओळख आहे.
’भली माणसं’ ह्या पुस्तकातील ’बाबा मास्तर’ ह्या व्यक्तिचित्राचा शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. भाग तीनच्या मराठी विषयाच्याअभ्यासक्रमात समावेश आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनातील विविध सत्रांमध्ये त्याचा सहभाग असतो. तसेच राज्यभरातील अनेक ग्रामीण साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनिय कार्य केलेल्या दि. बा. पाटील यांचा सन्मान आम्ही करतो आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे तानाजीराजे जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिका वासंती मेरू, राजारामबापू ललित कला अकादमीचे निमंत्रक प्रा. प्रदीप पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, ज्येष्ठ कवी सुभाष कवडे, ज्येष्ठ कवी महेश कराडकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अमृततात्या सुर्यंवशी हे प्रमुख उपस्थित राहाणार आहेत. असे तानाजीराजे जाधव यांनी सांगितले.