झेक प्रजासत्ताक उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / सिडनी
युनायटेड चषक सांघिक टेनिस स्पर्धेत कॅरोलिना मुचोव्हाच्या शानदार विजयामुळे झेक प्रजासत्ताकने इटलीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. आता झेक प्रजासत्ताक आणि अमेरिका यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.
इटली आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाने एकेरीच्या सामन्यात इटलीच्या पावोलिनीचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या संघाला उपांत्यफेरीत नेले. मुचोव्हा आणि पावोलिनी यांच्यात आतापर्यंत पाचवेळा सामने झाले आणि मुचोव्हाने हे सर्व सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षी इटलीच्या पावोलिनीने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम आणि विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
या लढतीत झेकच्या टॉमस मॅकहेकने इटलीच्या कोबोलीवर 6-1, 6-2 अशी मात केली. आता मुचोव्हा आणि मॅकहेक यांचे पुढील सामने अनुक्रमे कोको गॉफ व टेलर फ्रिज या अमेरिकन टेनिसपटूंशी होणार आहेत. इगा स्वायटेकचा पोलंड संघ कझाकस्थानबरोबर उपांत्यफेरीत लढत देईल. 12 जानेवारीपासून मेलबोर्न येथे सुरू होणाऱ्या 2025 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची युनायटेड चषक मिश्र सांघिक ही सरावाची टेनिस स्पर्धा म्हणून ओळखली जाते.