सिलिंडरचे दर वाढले,गृहिणीचे 'बजेट' कोलमडले
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
दैनंदिन जीवनात लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडर, डिझेल, पेट्रोल आणि धान्य व भाज्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आत्ता कुठे 856 रूपयांना गॅस मिळत होता. त्यात पन्नास रूपयांची वाढ झाल्याने 906 रुपये मोजावे लागणार आहेत. धान्य व भाज्यांमध्ये पाच ते 10 रूपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या मजूरांना मूळातच वेतन कमी मिळत असल्याने ते आणखी दारिद्र्यात लोटले जाणार आहेत.त्यामुळे सांगा आम्ही कसे जगायचे ?, असा प्रश्न गरीब जनतेकडून सरकारला विचारला जात आहे.
रोटी, कपडा आणि मकान या मानवाच्या दैनंदिन गरजा आहेत. परंतू याच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. असे असले तरी सर्वसामान्यांच्या रोजगारात मात्र वाढ नसल्याने घर कसे चालवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे योजना लागू करायच्या आणि दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे, सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. निवडणूकीपुर्वी लाडकी बहिण योजना लागू केली गेली.शहानिशा न करता अर्ज भरलेल्या प्रत्येकाला दरमहा दीड हजार रूपये दिले. निवडणूक झाल्यानंतर मात्र काही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले तर काही लाडक्या बहिणींना पैसेच मिळाले नाहीत. आता अक्षयतृतीयेच्या दिवशी पुढील हप्ता देण्याचे जाहीर केले असले तरी दुसरीकडे मात्र गॅसच्या किंमती वाढवून जनतेच्या खिशातून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. परंतू सरकारने जनतेच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत निवडणूकीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ केली आहे.
राज्यात ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमती कडाडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. शिक्षणही दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. शैक्षणिक साहित्याच्या किंमतीतही प्रचंड वाढ झाल्यामुळे गरीबांना शिक्षणाची दारे बंद करण्याचा प्रकार आहे. त्यातच अचानक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य कुटुंबाची चिंता वाढली आहे. शहरातील कुटुंबाना तर पाणी, वीज सर्वच वस्तूंसाठी पैसे मोजावे लागतात. दुसरीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह विजेचा प्रश्न गंभीर आहे. वाढत्या महागाईमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनतेला काही ठिकाणी आपले मन मारून जगण्याशिवाय पर्याय नाही.
- वेतनात वाढ नाहीच
गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या, परंतू हातावरचे पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मात्र वाढ झालेली नाही. त्यामुळे महिन्याचा बाजार केला की वेतन संपत असल्याने बचत करू शकत नसल्याचे अनेकांचे मत आहे. महागाई वाढतेय पण वेतन मात्र जैसे थे असल्याची खंत सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची आहे.
- घर चालवताना काटकसर
प्रत्येक वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने घर चालवताना काटकसर करावी लागतेय. एकीकडे लाडकी बहिण योजना व दुसरीकडे वस्तूंच्या किंमतीत वाढ करून आमच्याच खिशातून पैसे काढून घेतले जात आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वसामान्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माया शिंदे (गृहीणी, कोल्हापूर)
- गॅस सिलेंडरच्या दरात अचानक वाढ
निवडणूक कालावधीत सिलेंडरचे दर कमी केले आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र सिलेंडरचे दर 50 रूपयांनी वाढवले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चटका बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाल्याने घर-संसार कसा चालवायचा असा प्रश्न पडला आहे.
वैशाली जाधव (गृहीणी, कोल्हापूर)