मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावाला सुरुवात
आंध्रप्रदेशच्या 7 जिल्ह्यांमध्ये वाहतुकीला स्थगिती : ओडिशालाही अतिवृष्टीचा इशारा : तामिळनाडूत अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित
वृत्तसंस्था/ काकीनाडा
मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्री पूर्व किनाऱ्यावर धडकले आहे. या चक्रीवादळाने मछलीपट्टणम आणि कालींगपट्टणमदरम्यान काकिनाडाच्या आसपास किनाऱ्याला धडक दिली आहे. यानंतर 3-4 तासांमध्ये चक्रीवादळाने पूर्ण किनारा पार केला आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग 90-100 किलोमीटर प्रतितास इतका नोंदविला गेला आहे. याचबरोबर किनारी आंध्रप्रदेश आणि आसपासच्या ओडिशातील भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. प्रशासनाने संवेदनशील आणि सखल भागांमध्ये लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्रप्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग 90-100 किलोमीटर इतका राहिला आहे. चक्रीवादळाचा वाढता प्रभाव पाहता आंध्रप्रदेश सरकारने मंगळवारी रात्री 7 जिल्ह्यांमध्ये वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला. राज्य सरकारने मंगळवारी रात्री 8.30 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला आहे.
चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव कृष्णा, एलुरु, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, काकिनाडा, डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा आणि अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात दिसून आला आहे. सरकाने या सर्व भागांमध्sय सर्वप्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली असून यात राष्ट्रीय महामार्गही सामील आहेत.
केवळ आपत्कालीन सेवांना सूट
या बंदीदरम्यान केवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवांनाच अनुमती दिली जाईल. उर्वरित सर्व खासगी आणि सार्वजनिक वाहनांना रोखण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
वॉररुम सक्रीय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारींचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रेल्वेला पूर्व किनारा खासकरून आंध्रप्रदेश, ओडिशा आणि तेलंगणात सर्व खबरदारी घेण्याचा निर्देश दिला.
आंध्रप्रदेश ते ओडिशापर्यंत अलर्ट
बंगालच्या उपसागरात घोंगावणारे मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारी भागांच्या दिशेने सरकत मंगळवारी रात्री धडकले आहे. या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश ते ओडिशापर्यंत अलर्ट देण्यात आला. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे चेन्नई आणि उत्तर तामिळनाडूत अतिवृष्टी झाल्याने जनजीवन कोलमडले. तामिळनाडूत प्रशासनाने मंगळवारी अनेक क्षेत्रांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. किनारी आंध्रप्रदेशातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील 24 तासांदरम्यान आंध्रच्या अनेक भागांमध्ये उच्चांकी पावसाची नोंद झाली असून यामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे.
अनेक रेल्वेगाड्या रद्द
मोंथा चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेशमधील रेल्वेवाहतूक प्रभावित झाली आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारीदाखल दक्षिण मध्य रेल्वेने विजयवाडा विभागाच्या अंतर्गत धावणाऱ्या 54 रेल्वेफेऱ्या रद्द केल्या आहेत. विजयवाडा येथून धावणाऱ्या अनेक पॅसेंजर आणि एक्स्प्रेस रेल्वे दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर कुठलीही अप्रिय घटना रोखण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी खबरदारीदाखल पावले उचलली आहेत. रद्द रेल्वेफेऱ्यांविषयी माहिती देणारे एसएमएस अलर्ट रेल्वेने प्रवाशांना पाठविले आहेत.
30 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा अलर्ट
किनारी आंध्रप्रदेशात 30 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने कुठल्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी केली आहे. आवश्यक पुरवठा आणि तेल-गॅसचा भांडार सुनिश्चित करण्यात आला असून स्वच्छ पेयजलाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एसडीआरएफसाब्sात एनडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे.
24 तास नियंत्रण कक्ष अन् मदत केंद्र
प्रशासनाने 24 तास सक्रीय असलेले नियंत्रण कक्ष स्थापन केले असून 74 मदत केंद्रेही तयार ठेवण्यात आली आहेत. दूरसंचार सेवा सुरळीत ठेवण्यासाठी सेलफोन टॉवर्सवर जनरेटर तैनात करण्यात आले आहेत. तसेच कुठल्याही आपत्कालीन स्थितीत सहकार्यासाठी प्रशासनाने संपर्क क्रमांक जारी केले आहेत.