मिचौंग चक्रीवादळ आज धडकणार
तामिळनाडू-आंध्रात सतर्कता : 204 रेल्वेगाड्यांसह 70 विमानोड्डाणे रद्द
वृत्तसंस्था/ चेन्नई, हैदराबाद
बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबरला दाखल झालेले मिचौंग चक्रीवादळ मंगळवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकू शकते. या काळात 90 ते 110 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने सर्व अत्यावश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूमध्ये रविवारपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला असून भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. पाणी साचल्याने चेन्नई विमानतळाची धावपट्टी बंद करण्यात आली आहे. वादळामुळे तामिळनाडूतील महाबलीपुरम बीचवर समुद्राची पातळी सुमारे 5 फुटांनी वाढली आहे.
चक्रीवादळ मिचौंग हे बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे चौथे आणि 2023 साली हिंदी महासागरातील सहावे वादळ आहे. म्यानमारने या वादळाला मिचौंग असे नाव दिले आहे. सोमवारी मिचौंग वादळ दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर होते. ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकत दक्षिण आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडू किनाऱ्यामार्गे पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचणार आहे. ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि पाँडिचेरीमध्ये वादळाचा प्रभाव जाणवेल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. जोरदार वारे आणि संभाव्य मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ओडिशामध्ये 5 डिसेंबरसाठी ऑरेंज अलर्ट आहे. या राज्यांमध्ये एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत. तसेच आतापर्यंत 204 रेल्वेगाड्या आणि 70 विमानो•ाणे रद्द करण्यात आली आहेत.
तामिळनाडूमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सोमवार आणि मंगळवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये रविवारपासून सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 12 सेंमी पावसाची नोंद झाली आहे. काही भागात 20 ते 22 सेंमी पाऊस झाला आहे. सोमवारी शहरी भागातील शाळा, महाविद्यालये बंद राहिली. मंगळवारीही शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर 3 ते 4 फूट पाणी साचले होते. निवासी भागातील काही व्हिडीओ समोर आले असून त्यामध्ये अनेक गाड्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. तसेच चेन्नईच्या पेऊंगलथूर भागात एक मगर रस्त्यावर फिरताना दिसली.
आंध्रप्रदेशात दोन दिवस शाळांना सुटी
बंगालच्या उपसागरावर तयार होत असलेले मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 90-100 किमी ते 110 किमी प्रतितास असू शकतो. एनडीआरएफच्या 12 तुकड्या बचाव कार्यासाठी तैनात आहेत. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर 4 आणि 5 डिसेंबर रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.
ओडिशाच्या 5 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडत आहे. हवामान खात्याने 6 डिसेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मलकानगिरी, कोरापुट, रायगडा, गजपती आणि गंजम जिल्ह्यांसाठी 4 आणि 5 डिसेंबरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 2.75 ते 4.55 इंच पाऊस पडू शकतो. ओडिशा सरकारने किनारी भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस आणि वाऱ्याची शक्मयता लक्षात घेऊन पूर्व किनारपट्टी रेल्वेने 60 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाँडिचेरी-तेलंगणामध्येही अलर्ट जारी
वादळाच्या पार्श्वभूमीवर पाँडिचेरी सरकारनेही अलर्ट जारी केला आहे. पाँडिचेरीच्या सागरी भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. लोकांना 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किनारपट्टी भागात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तेलंगणा प्रशासनानेही वादळाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या काही भागात रविवारी हलका पाऊस झाला. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगडसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये येत्या काही दिवसात दाट धुके पडण्याची शक्मयता आहे. रविवारी काश्मीरमधील पहलगाम आणि गुलमर्ग भागात तापमान शून्यापर्यंत खाली पोहोचले होते.