ऑस्ट्रेलियात अल्फ्रेड चक्रीवादळामुळे हानी
3 लाखाहून अधिक घरं बुडाली अंधारात
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियात अल्फ्रेड चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनेक प्रांतांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आला आहे. क्वीन्सलँड प्रांतातील हजारो घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे अल्फ्रेड चक्रीवादळामुळे विध्वंसक वारे अन् अतिवृष्टी झाल्याने पूराचा इशारा जारी करण्यात आला आहे. क्वीन्सलँडमध्ये सुमारे 3,16,540 लोकांच्या घरांमधील वीजपुरवठा ठप्प झाला असून गोल्ड कोस्ट शहर सर्वाधिक प्र्रभावित क्षेत्र ठरले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
क्वीन्सलँडच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ शनिवारी धडकले आहे. यापूर्वी चक्रीवादळाचा धोका पाहता लाखो लोकांनी सुरक्षात्मक तयारी सुरू केली होती. क्वीन्सलँड आणि उत्तर न्यू साउथ वेल्समध्ये पूर अन् जोरदार वारे वाहत असल्याने स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी म्हटले आहे. आगामी दिवसांमध्ये अतिवृष्टी, जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.