सायकल ट्रॅक की हॉकर्स झोन?
विविध ठिकाणी सायकल ट्रॅकवर अतिक्रमण : सायकलीही धूळखात, महापालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात सायकल ट्रॅक बांधण्यात आले आहेत. त्याचबरोबर सायकलीदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी सायकल ट्रॅकवर अतिक्रमण झाले असल्याने प्रकल्पाचा मूळ उद्देशच हरवून बसला आहे. विविध ठिकाणच्या सायकली नादुरुस्त बनल्या असून याकडे स्मार्ट सिटी आणि महापालिकेने दुर्लक्ष केल्याने यासाठी खर्ची घातलेला कोट्यावधी रुपयांचा निधी वाया गेला आहे. त्यामुळे बेळगावकरांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कोट्यावधी रुपयांच्या निधीतून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे मूळ उद्देशच हरवला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सायकलचा वापर वाढविणे आणि सायकलस्वारांना सुविधा देण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र विविध ठिकाणच्या सायकल ट्रॅकवर फळ आणि भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्याने सायकल ट्रॅक कोठे आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
स्मार्ट सिटीने हा प्रकल्प राबविला असून विविध कामे पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडे त्याचे हस्तांतर करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्मार्ट सिटीच्या कामांची देखभाल महानगरपालिकेला करावी लागणार आहे. मात्र महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने न पाहता सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी रहदारी पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार मोहीम राबविली आहे. मात्र सायकल ट्रॅकवरील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे.
अतिक्रमणे हटवू
सायकल ट्रॅकवरील अतिक्रमणे यापूर्वीच हटविण्यात आली होती. आता पुन्हा अतिक्रमणे झाली असल्यास ती हटविण्यात येतील. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली जाईल.
- शुभा बी., मनपा आयुक्त