For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायबर गुन्हे वाढताहेत, सावधान!

09:41 PM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
सायबर गुन्हे वाढताहेत  सावधान
Advertisement

देशभरात सायबर गुन्हे वाढत आहेत. मुंबईमध्ये नुकत्याच एका सर्वेक्षणात मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 1181 कोटी ऊपयांची फसवणूक झालेली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. आपण भारतीय अत्याधुनिक यंत्रणेकडे जात आहोत. संपूर्ण जगात आज सर्वत्र सायबर यंत्रणा पसरलेली आहे मात्र भारतामध्ये छोट्या-छोट्या भाजी विक्रेत्यांकडे देखील आज ‘ऑनलाईन’ पैसे घेतले जात आहेत. या ऑनलाईनमुळे चिल्लर बाळगण्याची कोणालाही गरज राहिलेली नाही. शिवाय भारत सरकारला नव्याने नोटा छापण्याचीदेखील फारशी गरज राहिलेली नाही तसेच नव्याने प्रचंड प्रमाणात नाणी बाजारात आणण्याची गरज राहिलेली नाही. ऑनलाईनमुळे नागरिकांना खिशात पैसे बाळगणे फारसे आवश्यक राहिलेले नाही आणि त्यामुळेच ज्या चोऱ्या-माऱ्या होत होत्या, त्यांचे प्रमाण थोडे कमी झाले. मात्र अलीकडे काही ‘सॉफिस्टिकेटेड’ चोर या जगात निर्माण झाले आहेत आणि त्यातील बरेचसे ऑनलाईन चोर हे भारतात दडून बसलेले आहेत. अनेकांना टोप्या घालणे, हा त्यांचा उद्योग आणि अनेक सुशिक्षित मंडळीदेखील फोनवर फसतात. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 1181 कोटी ऊपयांची सायबरद्वारे फसवणूक व्हावी, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि तेवढाच धक्कादायक देखील आहे. चोरी करण्याच्या या धंद्याला कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे. नवीन नवीन यंत्रणा दिवसेंदिवस अशा पद्धतीने निर्माण होते की, त्यातून जास्तीत जास्त चोरट्यांना ऑनलाईनचे तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे आणि त्यातून कोणाच्याही बँक खात्यावरून हे चोरटे पैसे काढतात. एखादा फोन येतो काय आणि त्याला उत्तर दिल्यानंतर थोड्या वेळाने संबंधित व्यक्तीच्या खात्यावरून लाखो ऊपये गायब होतात आणि मध्यमवर्गीय श्रीमंत माणूस अचानक भिकेकंगाल बनतो. आपल्या देशात सायबरविषयक अत्याधुनिक यंत्रणा आहे.  जवळपास सर्वच राज्यांमध्ये पोलिस स्थानकामध्ये सायबर गुन्हे तपासणी यंत्रणेचा स्वतंत्र विभाग आहे मात्र पोलिसांच्या हातावरदेखील तुरी ठेवून चोर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन दरोडा टाकत आहेत आणि आपली पोलिस यंत्रणा त्यापुढे फार फिकी पडते किंवा थिटी पडतेय. अनेक गुन्हे सोडविण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. पोलिसांना त्यांची माहिती माहीत असते परंतु त्यातून संबंधितांना पकडून आणण्याचे धारिष्ट का होत नाही, हे समजत नाही. या देशात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात. आर्थिक क्षेत्रातही प्रचंड प्रमाणात दिवसेंदिवस सायबर गुन्हे घडत आहेत. मुंबईतील 1181 कोटी ऊपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणी केवळ 129 कोटी 15 लाख ऊपये परत आणण्यात पोलिसांना यश मिळते. याचाच अर्थ पोलिसांनी फार गांभीर्याने घेतले तर पोलीस सर्वच्यासर्व रक्कम परत आणू शकतात परंतु सर्व पुरावे हाती असूनदेखील केवळ शोध घेतला मात्र हाती काही मिळू शकले नाही, असा अहवाल देऊन ही प्रकरणे मिटवून टाकली जातात. म्हणजेच ग्राहकांची फसवणूक होत जाते आणि चोर मात्र ऐशोरामात असतात. दुसऱ्यांना फसविणे, दुसऱ्यांचे पैसे चोरणे, हाच काहींचा व्यवसाय बनलेला आहे. पोलिसांचे किंवा काही नेत्यांचे संरक्षण असल्याशिवाय या अशा गोष्टी शक्यच नाही अन्यथा जे पैसे चोरतात, त्यांची पाळीमुळे खोदून काढून पोलिसांनी गांभीर्याने प्रकरण घेतले असते तर 1181 कोटी ऊपये परत मिळाले असते. सुशिक्षितांचा देश, संस्कृतीचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतामध्ये अलीकडे डिजिटल यंत्रणेचा, सायबर यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात होणारा गैरवापर टाळणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणेचा मुळीच धाक राहिलेला नाही आणि गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात आल्यानंतरच ही प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईसारख्या जागतिक स्तरावरील आर्थिक क्षेत्रात सर्वात मोठे काम करणाऱ्या विभागातच आर्थिक गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे, हे काही चांगले लक्षण नाही. 2023च्या तुलनेत 2024मध्ये सायबर गुह्यांचे प्रमाण वाढले. म्हणजेच 2025मध्ये देखील हे प्रमाण आणखी वाढत जाईल. सायबर गुह्यांच्या बाबतीत देशातील कोणतेही सरकार गंभीर नाही. यापूर्वी जागतिक पातळीवरील अनेक राष्ट्रांतून सायबर गुन्हेगारी टोळ्या वावरत होत्या. आता अलीकडे या टोळक्यांनी भारतातील काही टोळक्यांशी संपर्क साधून हे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे अनेक गोरगरिबांची प्रचंड प्रमाणात फसवणूक झालेली आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना कष्टाने मिळविलेला पैसा नेमका कुठे सुरक्षित ठेवावा, याबाबतदेखील चिंता  वाटते आहे. देशात आर्थिक क्षेत्रात व्यावसायिक, उद्योजक, उद्योगपती एवढेच नव्हे तर सरकारी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारीदेखील सुरक्षित राहिलेले नाहीत. त्यांचे पैसे कधी काढले जातील, हे त्यांना कळणार नाही. सायबर गुन्हे का वाढतात आणि कोण नेमके या प्रकरणांमध्ये आहे, याचा शोध केंद्रातील यंत्रणा व राज्यातील यंत्रणा घेण्याचा प्रयत्न करीत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. आज जाईल तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे वाढत आहेत आणि सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.झारखंडमधील जामतारा या ठिकाणी सायबर गुन्हेगारींचे एक प्रमुख केंद्र आहे, याची माहिती  सरकारला आणि अनेक राज्य सरकारांना आहे परंतु तेथील टोळक्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. सायबर कॉल, सायबर एसएमएस तसेच ई-मेल वगैरे माध्यमांचा वापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. काहीजण त्यास बळी पडतात परंतु जे बळी पडत नाहीत, त्यांच्या फोनवर एखादा फोन आला तर तो अधिकृत आहे की नाही, याची माहिती मिळत नाही आणि त्यातून एका फोनच्या आधारे कित्येकांची बँक खाती रिकामी करण्यात आली. सायबर गुह्यांचे काही अ•s आहेत आणि त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर छापे टाकून अशा गुन्हेगारांना पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या गुह्याला प्रोत्साहनच मिळत जाईल. सरकारने अनेक कडक कायदे करून देखील त्याचा काहीही उपयोग आजपर्यंत झाला नाही कारण प्रत्यक्षात त्यांची ज्या पद्धतीने कडक पद्धतीने अंमलबजावणी होणे आवश्यक होते, तशा पद्धतीने गुह्यांचा तपास होत नाही. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक होते तर छोट्या-छोट्या प्रदेशात किंवा अनेक शहरांमध्ये होत असलेली परिस्थिती किती गंभीर असावी, याचा विचार होणे आवश्यक आहे. पुढील काळात तरी याची गांभिर्याने दखल घेत केंद्र सरकार अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळेल अशी आशा करुया.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.