सायबर गुन्हे मानवाधिकारांसाठी धोकादायक
राष्ट्रपती मुर्मू यांनी एआयच्या प्रभावावर मांडले मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मानवाधिकार दिनानिमित्त मानवाधिकार आयोगाकडून आयोजित एका कार्यक्रमात मंगळवारी भाग घेतला. या कार्यक्रमाला संबोधित करताना मुर्मू यांनी सायबर गुन्हे तसेच हवमान बदल हे मानवाधिकारांसाठी नवे धोके असल्याचे वक्तव्य केले आहे. मानवाधिकार दिन हा दरवर्षी 10 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.
भविष्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत असताना आमच्यासमोर नवी आव्हाने उभी ठाकत आहेत. सायबर गुन्हे, हवामान बदलामुळे मानवाधिकारांसमोर नवे धोके निर्माण झाले आहेत. डिजिटल युग परिवर्तन घडविणारे असले तरीही याचबरोबर सायबर गुन्हे, डीपफेक, गोपनीयतेची चिंता आणि चुकीच्या माहितीच्या प्रसार यासारखे जटिल मुद्देही समोर आले असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी एआय आणि मानवी जीवनावर त्याच्या प्रभावाविषयीही मतप्रदर्शन केले आहे. एआय आता आमच्या दैनंदिन जीवनात दाखल झाले असून ते अनेक समस्यांवर उपाययोजना करत आहे, परंतु आमच्या जीवनात अनेक नव्या समस्या देखील उभ्या ठाकत आहेत. आतापर्यंत मानवाधिकारांवर विचारविनिमय हा मानवी यंत्रणेवर केंद्रीत राहिला, कारण उल्लंघन करणारा हा मनुष्यच असल्याचे मानले जाते, ज्यात करुणा, गुन्ह्याची बोच यासारख्या विविध मानवी संवेदना असतात. परंतु आता एआयमुळे मानवाधिकारांसमोर व्यापक धोका निर्माण झाला आहे. हवामान बदल हा मुद्दा जागतिक स्तरावर मानवाधिकारांच्या विचारावर पुनर्विचार करण्यास भाग पाडत असल्याचे मुर्मू यांनी म्हटले आहे.