अमेरिकेतील मेडिकल लॅबवर सायबर हल्ला
रुग्णांची माहिती लीक : यावर्षी जागतिक स्तरावर आरोग्यसेवा क्षेत्रावर 716 हल्ले
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेतील सर्वात मोठ्या वैद्यकीय चाचणी कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘क्वेस्ट डायग्नोस्टिक्स’वर सायबर हल्ला झाला आहे. हा कारनाम्यामध्ये हॅकर्सनी रुग्णांचे वैद्यकीय अहवाल आणि वैयक्तिक माहिती हॅक केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, तूर्तास या सायबर हल्ल्यामुळे किती रुग्ण प्रभावित झाले आहेत, हे क्वेस्ट डायग्नोस्टिक्सने अद्याप उघड केलेले नाही.
‘क्वेस्ट डायग्नोस्टिक्स’ कंपनीने शुक्रवारी सायबर हल्ल्याविषयीची माहिती दिली. सायबर हल्लेखोरांनी किती रुग्णांची माहिती मिळवली आणि कोणत्या नोंदी प्रभावित केल्या याबाबत कंपनीकडून सविस्तर लेखाजोखा सादर करण्यात आलेला नाही. सध्या यासंबंधी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. सायबर सुरक्षा देखरेख कंपनी ‘कंपॅरिटेक’च्या मते, सप्टेंबर 2026 पर्यंत जगभरातील आरोग्यसेवा संस्थांवर 716 सायबर हल्ल्यांची नोंद झाली असून त्यापैकी 410 हल्ले एकट्या अमेरिकेत झाले आहेत.
ऑनलाईन प्रणाली हॅक
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या हॅकिंगचा परिणाम त्यांच्या क्वानम लॅब सर्व्हिसेस मॅनेजर प्रणालीवर झाला आहे. ही ऑनलाईन प्रणाली काही ग्राहकांकडून लॅब चाचण्या बुक करण्यासाठी, चाचणीचे अहवाल पाहण्यासाठी आणि मिळवण्यासाठी वापरली जाते. हल्ला झाल्याचे लक्षात येताच कंपनीने या प्रणालीचा वापर तात्पुरता थांबवला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. डॉक्टर आणि रुग्णालये कंपनीच्या लॅब सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड चा वापर करून नेहमीप्रमाणे प्रयोगशाळेतील चाचणीसाठी नमुने सादर करू शकतात, असे कंपनीने सांगितले.
