48 कोटींची सायबर फसवणूक
बेळगावसह राजस्थानच्या आरोपींना अटक : बेंगळूर सीसीबी पोलिसांची कारवाई : विदेशात बसून फायनान्स कंपनीचे खाते हॅक
प्रतिनिधी/ बेंगळूर
विदेशी आयपी अॅड्रेस वापरून एका खासगी फायनान्स कंपनीचे खाते हॅक करून 48 कोटी रुपयांना गंडा घातलेल्या दोन आरोपींना बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. इस्माईल रशीद अत्तार (वय 27, रा. अमननगर, बेळगाव) आणि संजय पटेल (वय 43, रा. उदयपूर-राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. राज्यात सायबर गुन्हेगारीला चाप लावणे आव्हानात्मक असताना ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून विस्डम फायनान्स कंपनीच्या विविध खात्यांमधून पैसे लाटल्याचा आरोप इस्माईल आणि संजयवर आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर 5 आरोपींचा शोध जारी आहे. आरोपींपैकी तिघे दुबईत तर दोघेजण हाँगकाँगमध्ये असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांच्या अटकेसाठी पुढील कारवाई हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विस्डम फायनान्स प्रा. लि. च्या वित्त विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी 9 ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून सीसीबीच्या सायबर गुन्हे स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करताना राज्यात आणि हैदराबादमध्ये आरोपींचा शोध घेतला होता. आरोपींनी विदेशात बसून व्हीपीएन नेटवर्क वापरून अकाऊंट हॅक केल्याचे तपासादरम्यान आढळून आले. फायनान्स कंपनीच्या दोन खात्यांमधून लंपास केलेले पैसे 653 बोगस अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केले होते, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.
अॅपची की हॅक
विस्डम फायनान्स प्रा. लि. कंपनीचे मनीव्हूव नावाचे अॅप असून त्यामार्फत जनतेला कर्जे दिली जात होती. आरोपींनी हाँगकाँग आणि फिलिपाईन्समध्ये बसून फ्रान्समधील आयपी अॅड्रेसचा वापर करून या अॅपची की हॅक केली होती. त्यानंतर त्यांनी फायनान्स कंपनीच्या दोन खात्यांवर आपले नियंत्रण मिळविले. तेथून एपीआय की हॅक करून 653 खात्यांमध्ये 48 कोटी रुपये ट्रान्स्फर केले. येथेही आरोपींनी आपली चतुराई दाखविली असून लंपास केलेल्या रकमेतील काही भाग लोकांच्या खात्यावर ट्रान्स्फर केला. पोलिसांच्या तपासाची दिशा चुकविणे हा यामागचा हेतू होता, असेही तपासातून उघडकीस आले आहे.
अवघ्या अडीच तासांत लूट
अटक करण्यात आलेल्यांपैकी इस्माईल हा दुबईतील हॅकिंग टिमशी संबंधित होता. आणखी एक आरोपी संजय पटेलच्या खात्यावर 27.39 लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. शिवाय हैदराबादमधील एकेलॉन सायन्स प्रा. लि. च्या खात्यात 5.5 कोटी रु. ट्रान्स्फर करण्यात आल्याचेही तपासातून उघडकीस आले आहे. या टोळीने अवघ्या अडीच तासांत 48 कोटी रुपये लुटले आहेत.