कुंभमध्ये नोंदणीच्या नावाखाली सायबर फसवणूक
उत्तर प्रदेश पोलिसांकडून जगजागृतीपर व्हिडिओ जारी : कुंभमेळा प्रशासनानेही उचलली पावले
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू होणारा महाकुंभमेळा यावेळी अनेक आव्हाने घेऊन येत आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोट्यावधी लोक येण्याचा अंदाज आहे. फसवणूक आणि चोरीच्या घटनांवर तसेच सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनासाठी मोठी चिंतेची बाब आहे. या सायबर गुन्हेगारांनी बनावट वेबसाईट तयार करून तंबू, कॉटेज आणि हॉटेल्स बुक करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळण्याचा कट रचला आहे. पोलिसांनी आतापर्यंत अशा 80 बनावट वेबसाईटचा तपास केला असून यातील 10 हून अधिक वेबसाईट बंद केल्या आहेत. त्यांच्याकडे फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत असून या प्रकरणांना आळा घालण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी एक जनजागृतीपर व्हिडिओ जारी करत भक्तांना आणि सर्वसामान्य लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने कुंभ परिसरात तंबू उभारण्यासाठी 8 कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्यांनी 2,200 कॉटेज तयार केले असून त्यात भाविकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयवीर सिंह यांनी दिली. भाविकांची फसवणूक होण्यापासून संरक्षण करणे आणि योग्य ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करणे हा त्याचा उद्देश आहे.
महाकुंभमेळा प्रशासनानेही बोटीच्या भाड्याबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी पावले उचलली आहेत. प्रशासन आणि खलाशी संघटनेने बोटीचे भाडे 75 रुपये निश्चित केले आहे. यासोबतच महाकुंभ काळात स्टीमर आणि मोटर बोटी चालवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची फसवणूक होऊ नये म्हणून आखाड्यांच्या संघटनेच्या सदस्यांनी भोंदू पुजारी आणि पंड्यांवर नजर ठेवण्याची तयारी केली आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रशासन अनेक कठोर पावले उचलत असून भाविकांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरण देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा केला जात आहे.