लग्नाच्या आमिषाने बेळगावच्या युवतीला सायबर गुन्हेगारांचा साडेतीन लाखांचा गंडा
नेदरलँडमध्ये डेंटल सर्जन असल्याचे सांगत फसवणूक
बेळगाव : लग्नासाठी रिबाऊन्स मॅचमेकिंग अॅपमध्ये मुलगा शोधताना परिचित झालेल्या एका अनोळखी युवकाने बेळगाव येथील एका युवतीला 3 लाख 38 हजार 800 रुपयांना गंडवले आहे. यासंबंधी शहर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलमेश्वरनगर येथील एक युवती 19 मार्च रोजी रिबाऊन्स मॅचमेकिंग अॅपमध्ये लग्नासाठी वर शोधत होती. यासाठी तिने रजिस्टरही केले होती. त्यानंतर स्वत:ला आर्यन कुमार असल्याचे सांगून एका व्यक्तीने त्या युवतीला हाय म्हणून मेसेज पाठविले. आपण मूळचा हैद्राबादचा आहे. सध्या नेदरलँडमधील इस्पितळात डेंटल सर्जन म्हणून काम करतो. तुमच्याशी लग्न करण्यासाठी माझ्या कुटुंबीयांनी होकार दिला आहे, असे सांगितले.
25 मे रोजी नेदरलँडहून आपण बेळगावला येत असल्याचे त्याने सांगितले होते. दुसऱ्या दिवशी 26 मे रोजी त्या डेंटल सर्जनचा युवतीला फोन आला. दिल्ली विमानतळावर आपल्याला पकडले आहे. त्यांच्याशी तू बोल, असे सांगून एका अनोळखी महिलेच्या हातात फोन दिला. त्या महिलेने बेळगावच्या युवतीला तुम्ही आर्यन कुमारला ओळखता का? त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात फॉरेन करन्सी आहे. भारतीय चलनामध्ये रुपांतरित करण्यासाठी 85 हजार 800 रुपये प्रोसेसिंग फी लागणार आहे, असे सांगितले.
बेळगावच्या युवतीने भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर 85 हजार 800 रुपये जमा केले. त्याच्यानंतर अनोळखी महिलेचा पुन्हा फोन आला. आर्यन कुमारकडे मोठ्या प्रमाणात सोने व हिरे आहेत. त्याला 2 लाख 53 हजार जीएसटी भरावे लागणार आहे, असे सांगण्यात आले. त्यावेळी बेळगावच्या युवतीने ही रक्कमही जमा केली. त्यानंतरही भामट्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. त्यावेळी संशय येऊन त्या युवतीने शहर सायबर क्राईम विभागात तक्रार केली आहे.