ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत सक्ती करू नये
नेरूर जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांची मागणी ; अधीक्षक अभियंताना दिले निवेदन
कुडाळ / शहर वार्ताहर
नेरूर-देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. तसेच वीज ग्राहकांनी स्वतः आपणास विनंती केल्याशिवाय कोणाच्याही घरी स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी मागणी नेरूर-देऊळवाडा जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी कुडाळ येथील महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,आपल्या नेरूर-देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघात एकूण सहा गाव येतात. यात नेरूर-देऊळवाडा,सरंबळ,वालावल, चेंदवण,कवठी, हुमरमळा ( वालावल) या गावांचा समावेश आहे. या गावातील ग्रामस्थांना स्मार्ट मीटर बाबत सक्ती असल्याबाबतचे मेसेज त्यांच्या मोबाईल फोनवर आल्याचे त्यांनी आपल्या निदर्शनास आणून दिले.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे नसल्याचे प्रसार माध्यमातून सांगितले. परंतु प्रशासनाकडून या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे समजते. आपल्या जिल्हा परिषद मतदार संघातील वीज ग्राहकांनी स्वतः आपणांस विनंती केल्याशिवाय कोणाच्याही घरी स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत. तसेच स्मार्ट मीटरबाबत धमकीचे मेसेज प्रसिद्ध करू नयेत, असे श्री पावसकर यांनी निवेदनात म्हटले आहे.