भारत-मालदीवमध्ये चलन करार
पंतप्रधान मोदी-अध्यक्ष मुईझ्झू यांच्या स्वाक्षऱ्या, परस्पर सहकार्य वाढविणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी चर्चा केली आहे. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या चलन हस्तांतरण (स्वॅपिंग) करार करण्यात आला असून सोमवारी या करारावर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. भारताच्या सुरक्षेला बाधा येईल अशी कोणतीही कृती करणार नाही, असे आश्वासन यावेळी मुईझ्झू यांनी दिले आहे.
भारताने मालदीवला 3 हजार कोटी रुपयांचे कर्जरुपी अर्थसाहाय्य देऊ केले आहे. या साहाय्यासंदर्भात मुईझ्झू यांनी भारताचे आभार मानले आहेत. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चलन हस्तांतरणाच्या करारात 40 कोटी डॉलर्सच्या (साधारणत: 3 हजार 400 कोटी रुपये) हस्तांतरणाची तरतूद आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या चलनांमध्ये व्यवहार होणे सुलभ झाले आहे. मालदीव हा भारताचा नजीकचा शेजारी आणि जीवाभावाचा मित्रदेश असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुईझ्झू यांच्याशी चर्चा केल्यानंतर केले. मालदीवच्या प्रत्येक आवश्यकतेला भारताने नेहमीच प्रथम प्रतिसाद दिला आहे. भारताने नेहमीच आपल्या प्रत्येक शेजारी देशांच्या संदर्भात आपले उत्तरदायित्व यथासांग पार पाडले आहे, अशीही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केली.
चलन हस्तातंरण करार
दोन्ही देशांमध्ये सोमवारी झालेला चलन हस्तांतरण करार मालदीवच्या दृष्टीने लाभदायक आहे. सध्या मालदीवला मोठ्या आर्थिक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत. भारताशी हा करार झाल्यामुळे आता त्या देशाला भारताकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यामध्ये आणि व्याज देण्यामध्ये सुविधा आणि सवलत मिळणार आहे. मालदीववर सध्या कर्जाचा प्रचंड डोंगर उभा आहे. त्याचा भार कमी करण्यासाठी हा करार त्या देशाला उपयुक्त ठरेल, असे तज्ञांचे मत आहे.
भारत प्रगतीत भागीदार
मालदीवच्या प्रगतीत भारताची भागीदारी महत्त्वाची आहे. मालदीवमधील सामाजिक-आर्थिक आणि पायाभूत सुविधा विकासात भारताने अतिशय निर्णायक भूमिका स्वीकारली आहे. मालदीवच्या प्रत्येक अवघड प्रसंगी भारताने साहाय्याचा हात पुढे केला आहे. यासाठी मालदीव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे सरकार यांचा नेहमी आभारी राहील, अशी भलावण मुईझ्झू यांनी केली.
करमुक्त व्यापाराच्या दिशेने
भारताशी करमुक्त व्यापार करार करण्याची मालदीवची इच्छा आहे. असा करार झाल्यास दोन्ही देशांना एकमेकांच्या आर्थिक क्षमतेचा पुरेपूर लाभ मिळविण्याची संधी मिळणार आहे. भारतालाही मालदीवच्या पर्यटन आणि इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे, असेही प्रतिपादन मुईझ्झू यांनी केले.
भारतीय पर्यटकांचे स्वागत
भारतीय पर्यटकांनी अधिकाधिक संख्येने मालदीव येथे पर्यटनासाठी यावे. आम्ही भारतीयांचे स्वागत करण्यास सज्ज आहोत. मालदीवचा पर्यटन व्यवसाय बहरत असून तो बऱ्याच अंशी भारतीय पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रात मोठे सहकार्य होऊ शकते. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील मैत्री अधिक वाढेल, अशीही अपेक्षा मुईझ्झू यांनी व्यक्त केली.
पहिलाच भारतीय दौरा
मोहम्मद मुईझ्झू यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये मालदीवची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतरचा त्यांचा हा प्रथम भारत दौरा आहे. प्रारंभीच्या काळात त्यांचा चीनकडे अधिक कल होता. त्यामुळे भारताने त्यांच्यासंबंधात सावध भूमिका घेतली होती. तथापि, आता त्यांनी भारताचे महत्त्व ओळखले असून भारताशी जुळवून घेण्यातच आपल्या देशाचे हित आहे, याची त्यांना जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांच्या धोरणात काही प्रमाणात परिवर्तन झाल्याचे दिसते, असे तज्ञांचे मत आहे.
परस्पर हिताची भूमिका
ड मुईझ्झू यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री अधिक वाढणार
ड भारताशी केलेल्या चलन हस्तांतरण कराराचा मालदीवला अधिक लाभ
ड पर्यटन आणि इतर विकास क्षेत्रात भारताला गुंतवणूक करण्याचे आवाहन