सिद्धरामय्या, शिवकुमारांच्या दिल्ली दौऱ्याविषयी कुतूहल
वरिष्ठांची भेट घेऊन राज्य काँग्रेसमधील गोंधळावर चर्चा करणार
. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
राज्य राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या मागणीसाठी काँग्रेसमधील 20 हून अधिक ज्येष्ठ आमदारांनी नवी दिल्लीत ठाण मांडलेले असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले. शनिवारी ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन पक्षातील गोंधळ दूर करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उभय नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
राज्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि जैविक तंत्रज्ञान खात्याने शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत विविध देशांच्या राजदुतांचा सहभाग असलेल्या ‘ब्रिज-2 बेंगळूर’ परिषदेत भाग घेण्यासाठी सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार दुपारी दिल्लीला रवाना झाले.
राज्यातील पोटनिवडणूक संपल्यामुळे काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ पुनर्रचनेची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसमधील 20 हून अधिक आमदारांनी चार दिवसांपूर्वीच दिल्ली गाठली. हायकमांडच्या भेटीसाठी ते तेथेच तळ ठोकून आहेत. तीन दिवसांपूर्वी या आमदारांनी एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन तीन-चार वेळा निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद द्यावे, अशी विनंती केली होती.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस सत्तेवर येऊन तीन वर्षे उलटत आहेत. त्यामुळे आमदारांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळविण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होणार असल्याचे समजते. याच दरम्यान, मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न सुटल्याशिवाय मंत्रिमंडळात फेरबदल करू नयेत, असा मुद्दा डी. के. शिवकुमार वरिष्ठांकडे करणार असल्याचे समजते. आधी नेतृत्व बदलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ते करू शकतात.
मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे प्रलंबित राहिला होता. आता या मुद्द्यावर काँग्रेसश्रेष्ठींना तोडगा काढणे अनिवार्य बनल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करून काँग्रेसश्रेष्ठी राज्य काँग्रेसमधील गोंधळ लवकरात लवकर दूर करण्याची शक्यता आहे.
मंत्री जारकीहोळींनी घेतलीडी. के. शिवकुमार यांची भेट
दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीनंतर राज्य काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला निर्माण झाला आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या दोन विधानपरिषद सदस्यांवर कारवाई झाल्यानंतर आता मंत्री जमीर अहमद खान यांच्यावरही कारवाईही होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हस्तक्षेप केला असून अल्पसंख्याक नेत्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेतल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.
दावणगेरे दक्षिण मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता पक्षविरोधी भूमिका घेतल्याने नासीर अहमद यांना मुख्यमंत्र्यांच्या राजकीय पदावरून हटविण्यात आले होते तर अब्दुल जब्बार यांना काँग्रेसच्य प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले. आता मंत्री जमीर अहमद यांच्यावर कारवाईची शक्यता असल्याने अल्पसंख्याक समुदायातील नेत्यांचा एक गट नाराज आहे. आता त्यांच्या पाठिशी मंत्री सतीश जारकीहोळी उभे राहिले आहेत. त्यांनी डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
अब्दुल जब्बार यांच्याविरोधात केलेली कारवाई मागे घ्यावी, असा सल्ला जारकीहोळींनी शिवकुमार यांना दिल्याचे समजते. जर कारवाई मागे न घेतल्यास हायकमांडच्या भेटीसाठी जाणार असल्याचा संदेशही त्यांनी दिल्याचे समजते.