महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी चुरस
निवडणुकीला अवघे चार दिवस : सत्ताधारी-विरोधी गटाकडून जोरदार प्रयत्न
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या 23 व्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 15 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी केवळ चार दिवस शिल्लक असल्याने सत्ताधारी गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच विरोधी गटाकडूनदेखील निवडणुकीची रणनीती ठरवली जात असून यावेळच्या निवडणुकीबाबत मोठ्या कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी महापौरपद सामान्य वर्गासाठी आणि उपमहापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे इच्छुकांकडून महापौर व उपमहापौर पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी केली जात आहे. काहींनी तर चक्क यापूर्वीच माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे यावेळच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या 58 प्रभागांमध्ये 35 भाजप, काँग्रेस 10, एमआयएम 1 आणि अपक्ष नगरसेवक 12 आहेत. अलीकडेच नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने भाजपची संख्या 35 वरून 33 वर आली आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. यावेळी दक्षिण मतदारसंघासाठी महापौर-उपमहापौर पद दिले जाणार आहे. तर 24 व्या महापौर-उपमहापौर निवडणुकीवेळी उत्तर मतदारसंघातील नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. प्रभाग क्रमांक 24 चे नगरसेवक व सत्ताधारी गटाचे नेते गिरीश धोंगडी व प्रभाग क्र. 6 चे नगरसेवक संतोष पेडणेकर यांच्यासह चौघेजण महापौर पदासाठी इच्छुक असल्याचे समजते. महापौर पद हुकल्यास किमान उपमहापौरपद तरी द्यावे, यासाठी महिलांकडूनदेखील वरिष्ठांवर दबाव आणला जात आहे.
महापालिकेतील मतदारांचे संख्याबळ
- भाजप............................33
- काँग्रेस...........................10
- एमआयएम.....................1
- अपक्ष.............................12
- आमदार..........................4
- खासदार..........................2
- विधानपरिषद सदस्य........1
- एकूण...............63