लेहमध्ये 7 तासांनी संचारबंदी शिथिल
► वृत्तसंस्था/ लेह
गेल्या पाच दिवसांपासून तणावाच्या छायेत असलेल्या लेहमधील संचारबंदी मंगळवारी काहीशी शिथिल करण्यात आली. मंगळवार सकाळी 10 वाजल्यापासून लेह शहरातील संचारबंदी सात तासांसाठी शिथिल केल्यामुळे स्थानिक लोकांना दिलासा मिळाला. लेहचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी गुलाम मोहम्मद यांनी या कालावधीत सर्व किराणा, अत्यावश्यक सेवा, हार्डवेअर आणि भाजीपाला दुकाने उघडण्याचे आदेश दिले. यापूर्वी, सोमवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून दोन तासांसाठी कर्फ्यू शिथिल करण्यात आला होता. मंगळवारी सकाळी सुरुवातीला 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती आणि नंतर ती 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आली. परिस्थितीनुसार शिथिलता वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्वतंत्र राज्याचा दर्जा मागण्यासाठी लडाखमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान येथे हिंसाचाराचा भडका उडाला होता.