For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संभलमध्ये संचारबंदीसदृश स्थिती

06:44 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
संभलमध्ये संचारबंदीसदृश स्थिती
Advertisement

सप खासदार, आमदाराच्या पुत्रावर एफआयआर : एकूण 2500 गुन्ह्यांची नोंद

Advertisement

वृत्तसंस्था/ संभल

उत्तरप्रदेशच्या संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान रविवारी भडकलेल्या हिंसेनंतर सोमवारी सकाळपासून पूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. हिंसा प्रभावित भागांमध्ये संचारबंदीसदृश स्थिती आहे. प्रशासनाने स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. पोलीस महानिरीक्षक मुनिराज यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने हिंसा प्रभावित भागांमध्ये संचलन केले आहे. शहराती सर्व प्रमुख चौकांमध्ये बॅरिकेडिंग करण्यात आले असून प्रवेश मार्गांवर पोलीस तैनात आहेत. पोलिसांनी आतापर्यंत हिंसेप्रकरणी 25 जणांना अटक केली असून यात दोन महिलांचाही समावेश आहे. तर या भागात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. इंटरनेट मंगळवारपर्यंत बंद राहणार आहे.

Advertisement

संभल जिल्ह्यातील हिंसा प्रकरणी दोन पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. संभल येथील सप खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खासदारासोबत स्थानिक सप आमदार इक्बाल महमूद यांच्या पुत्राच्या विरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघांवरही दंगल भडकविल्याचा आरोप आहे. याचबरोबर 2500 जणांवर गुन्हे नोंद झाले आहेत.

संचारबंदीसारखी स्थिती

संभल शहरात सध्या अघोषित संचारबंदीसारखी स्थिती आहे. सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी स्थितीवर करडी नजर ठेवून आहेत. लोकांना अफवांवर लक्ष न देण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. मुरादाबाद क्षेत्रातील 30 पोलीस स्थानकांमधील पोलीस कर्मचाऱ्यांना संभलच्या हिंसाग्रस्त भागामध्ये तैनात करण्यात आले आहे.

 

कठोर कारवाईची तयारी

जिल्हाधिकारी राजेंद्र पैंसिया यांनी एक डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. हिंसेत सामील आरोपींच्या विरोधात गँगस्टर अॅक्ट आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी सांगितले आहे. हिंसेप्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 400 हून अधिक अज्ञात आरोपींवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

शहरात शांतता, घरांना टाळे

हिंसेनंतर शहरातील बाजारपेठ आणि दुकाने पूर्णपणे बंद आहेत. प्रभावित भागांमध्ये बहुतांश घरांबाहेर टाळे लावलेले आहे. पोलिसांनी गस्त वाढविली असून 24 तासांसाठी इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

5 जणांचा मृत्यू, पोलीस जखमी

रविवारी भडकलेल्या हिंसेत 5 युवकांचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांना गोळी लागली असून पोलीस अधीक्षकांसमवेत एकूण 22 पोलीस जखमी झाले आहेत. संभल शहरातील जामी मशिदीला हरिहर मंदिर ठरवत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यालयाने वादग्रस्त परिसरात सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. यानुसार सर्वेक्षणासाठी आयुक्तांची टीम पोहोचली असता संभलमध्ये हिंसा झाली आहे. टीमकडून सर्वेक्षण सुरू असता जमाव मशिदीत दाखल होण्यासाठी प्रयत्न करत होता. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने दगडफेक सुरू केली होती. हिंसक जमावाने अनेक वाहनांची तोडफोड करत त्यांना पेटवून दिले आहे. याचदरम्यान जमावाकडून गोळीबारही सुरू करण्यात आला. यावर पोलिसांनी अश्रूधूराचा मारा करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान झालेल्या हिंसेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Tags :

.