मणिपूरच्या जिरीबाममध्ये संचारबंदी
बेपत्ता व्यक्तीच्या हत्येनंतर स्थानिकांची निदर्शने
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूर सरकारने जिरीबाम जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. उग्रवाद्यांकडून एका 59 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आल्यावर लोक निदर्शने करत होते. ही निदर्शने पाहता राज्य सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे.
सोइबम शरतकुमार सिंह यांचा मृतदेह मिळाल्यावर स्थानिक लोकांनी काही ठिकाणी जाळपोळ केली आहे. ही घटना पाहता गुरुवार रात्रीपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली. तर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण असले तरीही शांततेची स्थिती होती.
मृत सोइबम शरतकुमार सिंह हे गुरुवार सकाळपासून स्वत:च्या शेतातून बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह हस्तगत झाला होता. त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. मृतदेह मिळाल्यावर स्थानिक लोकांनी जिरीबाम पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने सुरू केली. निवडणुकीच्या काळात काढून घेण्यात आलेल्या परवानायुक्त बंदुका परत करण्याची मागणी लोकांनी केली आहे. तर निदर्शने पाहता प्रशासनाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
समाजकंटकांच्या हालचालींमुळे भागात दंगल होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. जिरीबाम जिल्ह्यात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. समाजाच्या सर्व घटकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार आहेत.
मणिपूरमध्ये मागील एक वर्षापासून हिंसा सुरू आहे. मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात मागील वर्षी 3 मे रोजी पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकजुटता रॅली’च्या आयोजनानंतर हिंसा सुरू झाली होती. राज्यात आतापर्यंत 160 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत.